सुशीलकुमार शिंदे /प्रसाद हावळे

उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांचा ‘द स्ट्रेलेमा’ने घेतलेला हा अनुभवनिष्ठ धांडोळा…

three member of chavan family name in bjp lottery draw
भोकरमध्ये चव्हाण कुटुंबातीलच तिघे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Chhagan Bhujbal NCP
Yeola : येवला मतदारसंघाचं महत्त्व काय? छगन भुजबळांनी या ठिकाणी त्यांचं वर्चस्व कसं प्रस्थापित केलं?
bjp, maharashtra assembly
“महाराष्ट्र जिंकल्यास देश जिंकल्याचा संदेश”, अमित शहा यांचे कार्यकर्त्यांना एकजूट राखण्याचे आवाहन
Mohol, Ajit Pawar, conflict between Patil Mohol,
सोलापूर : अजित पवारांनी इशारा देऊनही मोहोळमध्ये दोन पाटलांचा संघर्ष सुरूच
Pimpri-Chinchwad, Mahayuti, NCP Ajit Pawar group,
पिंपरी- चिंचवडमध्ये महायुतीत धुसफूस; राष्ट्रवादीचा सर्व मतदारसंघांवर दावा
NCP Ajit Pawar group, Chinchwad, Bhosari,
राष्ट्रवादीचा पिंपरीसह चिंचवड, भोसरीवर दावा; थेट…
western Maharashtra vidhan sabha
पश्चिम महाराष्ट्रात मविआची मुसंडी?

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये मतदान झाले. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर अशा पाच जिल्ह्यांतील एकूण आठ लोकसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रात येतात. २०१९ च्या निवडणुकीत या सर्व आठ मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला होता. या निवडणुकीत जळगाव मतदारसंघाचा अपवाद वगळता महायुतीकडून आठपैकी सात विद्यामान खासदारांना पुन्हा रिंगणात उतरवण्यात आले. यातील पाच खासदार हे २०१४ पासून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून आठही मतदारसंघांमध्ये नवे उमेदवार देण्यात आले. या आठपैकी शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी प्रत्येकी तीन जागांवर आणि काँग्रेसने दोन जागांवर निवडणूक लढवली. तर महायुतीकडून आठपैकी सहा जागांवर भाजपचे आणि दोन जागांवर शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले. महाराष्ट्रातील शेवटच्या दोन टप्प्यांत मतदान पार पडलेल्या या आठही मतदारसंघांमधील लढतींचा मागोवा घेतला असता, त्यातले विविध कंगोरे पुढे आले.

हेही वाचा >>> अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला विरोध – नाना पटोले

सुरुवात करू नंदूरबारपासून. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या हिना गावित या खासदार आहेत. यावेळीही भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून आमदार के. सी. पाडवी यांचे सुपुत्र गोवल पाडवी यांना रिंगणात उतरवण्यात आले. आदिवासीबहुल असलेल्या या मतदारसंघात भिल्ल समाजाचा कल हा गोवल पाडवी यांच्या बाजूने दिसून आला. तर पावरा आणि हिंदू कोकणा मतदारांना आपल्याकडे राखण्यात हिना गावित यांना यश मिळताना दिसले. तसेच ओबीसी मतदारांचा कल प्रामुख्याने हिना गावित यांच्या बाजूने दिसून आला. शिरपूर आणि नंदूरबार या विधानसभा मतदारसंघांत हिना गावित यांना मतदार अनुकूल दिसले. तर नवापूर या मतदारसंघाचा कल काँग्रेसच्या गोवल पाडवी यांच्या बाजूने दिसून आला. मात्र अक्कलकुवा या मतदारसंघात विद्यामान आमदार के. सी. पाडवी यांच्याविषयी स्थानिकांमध्ये असलेली नाराजी पाहता, पाडवी यांना मतदारांना काँग्रेसकडे वळवण्यात फारसे यश आल्याचे दिसले नाही. आदिवासी बहुल मतदारसंघावर असलेला विजयकुमार गावित यांचा प्रभाव व नरेंद्र मोदींना मानणारा मतदार ही हिना गावित यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. घटक पक्षांतील नाराज नेत्यांची मदत नेमकी कोणाला होते आणि ठरावीक पक्षांचा प्रभाव असलेले मतदारसंघ कोणाच्या बाजूने जातात, यावर नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल.

भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झालेला दुसरा मतदारसंघ म्हणजे धुळे. येथे भाजपकडून विद्यामान खासदार सुभाष भामरे यांना, तर काँग्रेसकडून माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली. बाहेरील म्हणजे नाशिकमधील उमेदवार दिल्याचे कारण पुढे करत धुळे मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये बच्छाव यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी दिसून आली. काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पदांचे राजीनामे दिले, तर जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे बच्छाव यांना प्रचारासाठी फार कमी वेळ मिळाला. मालेगाव बाह्य आणि बागलाण या नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांत गेल्या वेळी सुभाष भामरे यांना अधिक मतदान झाले होते. त्यांना तिथे शह देण्यासाठी बच्छाव यांना उमेदवारी दिली असली, तर काँग्रेसला या दोन्ही मतदारसंघांमध्ये हिंदू मतांचे ध्रुवीकरण रोखण्यात यश आलेले दिसले नाही. याउलट सुरुवातीला आदिवासी मतदारांमध्ये भाजपविषयी असलेली नाराजी दूर करण्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांना यश आल्याचे दिसले. मात्र, इतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार स्पर्धेत नसल्याने मुस्लीम आणि दलित मतदार एकगठ्ठा काँग्रेसकडे वळल्याचे दिसले. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार कुणाल पाटील यांनी प्रभावी राजकीय नियोजन केले असले, तरी ते मागच्या वेळेस या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली पिछाडी किती प्रमाणात भरून काढतात हे निर्णायक ठरेल. मालेगाव मध्य मतदारसंघातून काँग्रेसला मिळणारी निर्णायक आघाडी भाजप उर्वरित मतदारसंघांमध्ये भरून काढण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहायचे.

शेजारी जळगावमध्ये विद्यामान खासदार उन्मेष पाटील यांच्याऐवजी भाजपने माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबतच प्रवेश केलेल्या पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाने रिंगणात उतरवले. जळगाव ग्रामीण, जळगाव शहर आणि अमळनेर या विधानसभा मतदारसंघांमध्ये स्मिता वाघ यांच्या बाजूने मतदारांचा कल दिसला. तर पारोळामध्ये करण पवार यांची असलेली वैयक्तिक ताकद आणि चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील उन्मेष पाटील यांचा प्रभाव या बाबी करण पवार यांच्यासाठी जमेच्या ठरताना दिसल्या. मात्र ओबीसी मतदार येथे मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने आणि मुस्लीम व दलित मतदार शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसले. मतदारसंघातील भाजपचे प्रभावी राजकीय व्यवस्थापन आणि घटक पक्षांच्या मतदारसंघांतून भाजप उमेदवाराला मिळालेली रसद यातच या मतदारसंघाचा निकाल दडलेला आहे.

हेही वाचा >>> “लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!

भाजपने लढवलेला चौथा मतदारसंघ म्हणजे रावेर. येथे विद्यामान खासदार रक्षा खडसे यांनाच भाजपने पुन्हा रिंगणात उतरवले. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. या लोकसभा मतदारसंघात एकही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा नसणे आणि एकनाथ खडसे यांनी ऐनवेळी महाविकास आघाडीतून घेतलेली माघार याचा फटका येथे श्रीराम पाटील यांना बसताना दिसला. मतदारसंघातील ओबीसी मतदार, विशेषत: लेवा पाटील प्रामुख्याने रक्षा खडसे यांच्या पाठीशी उभे राहताना दिसले. मलकापूर आणि रावेर या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची मदत येथे श्रीराम पाटील यांना मिळताना दिसली. मुस्लीम आणि दलित मतदारही प्रामुख्याने पाटील यांच्याकडे वळल्याचे पाहायला मिळाले. परंतु वैयक्तिक जनसंपर्क, मोदींना मानणारा मतदार आणि गिरीश महाजन यांचे राजकीय व्यवस्थापन या बाबी रक्षा खडसे यांच्यासाठी जमेच्या ठरल्या. सुरुवातीपासून एकतर्फी वाटणारी रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अखेर कोणाच्या बाजूने कौल देते, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष यांच्यात थेट लढत झालेला दुसरा मतदारसंघ म्हणजे दिंडोरी. येथे भाजपने विद्यामान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भास्कर भगरे यांना रिंगणात उतरवले. कांदा निर्यातीचा आणि द्राक्ष हमीभावाचा प्रश्न ज्वलंत बनलेल्या या मतदारसंघात शेतकरी वर्गात नाराजी दिसून आली. कळवणमध्ये मित्र पक्षाचे आमदार नितीन पवार यांच्यामुळे भारती पवार यांना फायदा दिसून येत असला, तरी सुरगाणा तालुक्यात मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित यांची मदत भास्कर भगरे यांच्यासाठी जमेची बाब ठरली. चांदवडमध्ये भाजपचा प्रभाव भारती पवार यांच्या पथ्यावर पडला, तर स्थानिक उमेदवार असल्याने दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये भास्कर भगरे यांच्या बाजूने मतदारांचा कल दिसून आला. आदिवासी समाजातील हिंदू कोकणा आणि महादेव कोळी या प्रमुख जमातींचे उमेदवारांच्या जात-पार्श्वभूमीमुळे ध्रुवीकरण झालेले पाहायला मिळाले. ओबीसी मतदारही दोन्ही उमेदवारांमध्ये विभागला गेल्याचे दिसले. तर मुस्लीम आणि दलित मतदार येथे महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहताना दिसला. शेतकऱ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून चर्चेत आलेल्या या निवडणुकीत निफाड आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांतील तूट भाजप मित्र पक्षांच्या मदतीने भरून काढू शकेल का, यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल.

शेजारी नाशिक मतदारसंघामध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्या. या मतदारसंघात उमेदवारांच्या निवडीवरून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सुरुवातीला बराच संभ्रम दिसून आला. तरी शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडून बऱ्याच विलंबाने विद्यामान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. सिन्नर विधानसभा मतदारसंघात स्थानिक असल्याचा फायदा राजाभाऊ वाजे यांना होताना दिसला. तसेच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील मराठा आणि आदिवासी मतदारांचा कल प्रामुख्याने वाजे यांच्याबाजूने दिसला. नाशिक शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत (पूर्व, मध्य आणि पश्चिम) भाजपची असणारी ताकद हेमंत गोडसे यांच्यासाठी जमेची ठरली. तर देवळाली विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवार असण्याचा आणि शिवसेना ठाकरे गटाचे विजय करंजकर यांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचा फायदा हेमंत गोडसे यांना होताना दिसला. उमेदवार केंद्रस्थानी राहिलेल्या या चुरशीच्या लढतीत, घटक मित्र पक्षांचा मतदार ज्याला टिकवता येईल त्या उमेदवाराच्या बाजूने निकाल असेल.

नाशिकप्रमाणेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातही दोन्ही शिवसेनांमध्ये थेट लढत झाली. येथे शिवसेना शिंदे गटाने विद्यामान खासदार सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी कायम राखली. तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उत्कर्षा रूपवते यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्या वंचित बहुजन आघाडीतर्फे येथे रिंगणात उतरल्या. उत्कर्षा रूपवते यांना दलित मतदारांचा मिळणारा पाठिंबा आणि श्रीरामपूर व अकोले या विधानसभा मतदारसंघांतील त्यांची सक्रियता यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला काही प्रमाणात तिरंगी लढतीचे स्वरूप आले. रूपवते यांच्यामुळे ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना अकोले आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मतविभाजनाला सामोरे जावे लागल्याची स्थिती पाहायला मिळाली. दोन्ही शिवसेनांसोबतच इथे कळीच्या ठरणाऱ्या घटक मित्र पक्षांची साथ कोणाला मिळाली, यावरच या मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये महायुतीचे वर्चस्व राहिलेल्या उत्तर महाराष्ट्रात यावेळी प्रस्थापितविरोधी अंत:प्रवाह दिसत असला, तरी तो दूर करण्यात महायुतीकडून प्रभावी नियोजन झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील वर्चस्व सलग तिसऱ्यांदा टिकवण्यात महायुती यशस्वी ठरते का, हे पाहायचे.

चर्चा आणि चुरस

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे अहमदनगर दक्षिण. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष यांच्यातील थेट लढत येथे कमालीची चुरशीची झाली. भाजपकडून विद्यामान खासदार सुजय विखे-पाटील यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून पारनेरचे आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली. घराणेशाही, धनशक्ती यांसारखे मुद्दे आणि पाण्याचा व एमआयडीसीचा प्रश्न उपस्थित करत निलेश लंके यांनी सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. याउलट सुजय विखे यांच्याकडून विकासाचे मुद्दे उपस्थित करत आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा वापर करत आक्रमक प्रचार करण्यात आला. सुरुवातीला मतदारांची दिसत असलेली नाराजी दूर करण्यात सुजय विखे यांना अखेरच्या टप्प्यात यश मिळताना दिसले. सहकार क्षेत्राचे पाठबळ आणि हिंदुत्ववादी मतदारांची साथ सुजय विखे यांच्यासाठी जमेची ठरताना दिसली. वेगवेगळ्या कारणांनी राज्यभर चर्चेत राहिलेल्या या मतदारसंघाचा निकाल मात्र मतदारसंघनिहाय केली गेलेली राजकीय बांधणी आणि टिकवलेला स्वपक्षाचा मतदार यातच दडलेला दिसून येईल.

sushil@strelema.com

prasadhavale@icpld.org