लातूर – विलासराव देशमुख फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक १४ मार्च रोजी पीव्हीआर चित्रपटगृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राहणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, खासदार शिवाजी काळगे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, अतिरिक्त सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खर्गे, बिभिषन चावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मिना, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या कार्यकारी संचालक श्रीमती स्वाती मसे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे उपस्थित राहणार आहेत.
चार दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात अनेक चित्रपट दाखवले जाणार आहेत. १४ ते १७ तारखेपर्यंत हा चित्रपट महोत्सव लातूरात आयोजित करण्यात आला आहे. १५ मार्च रोजी सकाळी सहा वाजता प्लास्टिक गन्स, दुपारी बारा वाजता इन रिट्रीट, सायंकाळी चार वाजता स्नो फ्लावर, असे एकूण चार दिवसात २४ चित्रपट पाहता येणार आहेत. रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.