लोणंद – खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ आज(गुरुवार) पहाटे फिरायला (मॉर्निंग वॉक) निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये वृद्ध दाम्पत्य व त्यांच्या सुनेचा समावेश आहे.

लोणंद – खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळील घाडगे मळा परिसरात आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास बबन नाना धायगुडे (वय ७०) , शांताबाई बबन धायगुडे (वय- ६४ ) व सारिका भगवान धायगुडे (वय – ३४) हे सकाळी फिरायला घराबाहेर पडले होते. घरापासून खंडाळाच्या दिशेने काही अंतर ते चालत गेल्यानंतर एका भरधाव  कारने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. यामुळे घडलेल्या अपघातात बबन धायगुडे व शांताबाई धायगुडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांची सुन सारीका धायगुडे या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहीती मिळताच आसपासचे ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सारीका धायगुडे यांना तत्काळ स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र त्यानंतर त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी नेले जात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

अपघातानंतर घटनास्थळावरून निघून गेलेले वाहन माळेगाव ता.बारामती येथे आढळून आले. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन न थांबता निघुन गेले होते. घटनास्थळी या वाहनाची नंबर प्लेट आढळून आली आहे. त्यावरून पोलिसांनी वाहनाचा शोध घेतला असता माळेगाव (ता. बारामती) येथे रस्त्याच्या बाजूला वाहन उभे करून चालक फरार झाल्याचे समोर आले.
घटनास्थळी लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी आपल्या सहकाऱ्यासमवेत दाखल झाले. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे. पुढील तपास लोणंद पोलीस करीत आहेत.

Story img Loader