सांगली : मान्यवर रंगकर्मीच्या उपस्थितीत ५ नोव्हेंबर रोजी सांगलीत शंभराव्या  अखिल भारतीय नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ रोवण्यात येणार असल्याची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याची सुरूवात सांगलीत रंगभूमी दिनी म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. यावेळी दुचाकी रॅली, नाट्य प्रयोग, नाट्य दिंडी, संहिता व नटराज पूजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोविंद बल्लाळ देवल यांचे निवासस्थान, मिरजेतील बालगंधर्व रंगमंदिर, विष्णुदास भावे यांचा भावे वाडा, काकासाहेब खाडिलकर यांचे दत्त मंदिर  या नाट्य  चळवळीच्या ठिकाणाहून संहिता गणेश मंदिरात आणण्यात येणार आहेत. तेथून भावे नाट्य मंदिर येथे संहिता नाट्य दिंडीने वाजतगाजत आणण्यात येतील. त्यानंतर विष्णुदास भावे यांच्या पुतळ्यासमोर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले व अन्य मान्यवरांच्या हस्ते या संहितांचे पूजन होणार आहे.तसेच राजेंद्र पोळ यांच्या दहा नाट्य संहिता व गीतांजली ठाकरे यांच्या दौत लेखणी या नाट्यविषयक विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाउसाहेब भोईर, कार्यवाह अजित भुरे, सतील लटके, संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गजवी, जब्बार पटेल, शशी प्रभू, अशोक हांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आमदार गाडगीळ यांनी सांगितले. यावेळी उद्योजक गिरीष चितळे, प्रा. वैजनाथ महाजन, अंजली भिडे, चंद्रकांत धामणीकर, मुकुंद पटवर्धन, भालचंद्र चितळे, सनित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The timing of the 100th theater meeting on rangbhumi day sangli amy
Show comments