मालवण : दहा हजार लोकसंख्येचे गाव, पण सगळे ओस पडलेले. प्रत्येक घराला कुलूप. घरेदारे, दुकाने, बँका, सरकारी कार्यालये, शाळा, रस्ते, चौक, चावडी, शेतशिवार सर्वत्र शुकशुकाट… गावातील माणसेच नाहीतर कुत्री, मांजरे, कोंबड्याही गावाबाहेर. मालवणजवळील आचरा या गावातील हे दृश्य. गाव शुद्धीकरणाच्या हेतूने सुरू झालेल्या ‘गावपळण’ परंपरेचा कौल यंदा गावाला झाला आणि पाहतापाहता रविवारपासून ३ दिवसांसाठी सगळे गाव रिकामे झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालवणहून २० किलोमीटरवर असलेले आचरा हे समुद्रकिनाऱ्यावरील एक निसर्गरम्य टुमदार गाव. येथील प्राचीन श्री रामेश्वर मंदिर प्रसिद्ध. या रामेश्वराचाच दर तीन किंवा अपवादात्मक चार वर्षांनी कौल निघतो. प्रत्येक व्यक्तीने घरातील पशुधनासह तीन दिवसांसाठी गाव सोडायचे. गावाबाहेर जाऊन राहायचे. या काळात गावात कुणीही प्रवेश करायचा नाही. गावातील हवा, पाणी, माती, झाडे अशा साऱ्या निसर्गाला तीन दिवस विश्रांती द्यायची. गावातील हवा काही प्रमाणात शुद्ध करायची, पाण्याचे स्राोत पुन्हा नितळ करायचे, रोगजंतूंची साखळी तोडायची हा यामागचा खरा हेतू… लोकांनी तो पाळावा यातून या काळात गावात  असुरी शक्तींचा वावर असल्याचे सांगितले गेले. या परंपरेला स्थानिक लोक ‘गावपळण’ म्हणतात. यंदा तीन वर्षांनी ‘गावपळण’साठी देवाचा कौल निघाला. यानुसार १५ ते १७ डिसेंबरदरम्यान सगळे आचरा गाव शिवाराबाहेर राहण्यास गेले आहे. पूर्वी ही ‘गावपळण’ महिनाभर असायची. पुढे दिवस कमी-कमी होत गेल्या काही दशकांत तीन दिवस सर्वजण गावाबाहेर पडतात.

हेही वाचा >>>मंत्र्यांची ओळख : हसन मुश्रीफ

‘गावपळणी’मुळे सध्या प्रत्येक घराला कुलूप लागले आहे. घराभोवती राखेचे कुंपण घालून तीन दिवस पुरेल एवढा शिधा, गरजेचे साहित्य, औषधे बरोबर घेऊन ग्रामस्थ पडले आहेत. गावातील दुकाने, व्यवसाय, मंदिरे, शाळा एवढेच नाहीतर बँका आणि सरकारी कार्यालयेही बंद आहेत. राहण्यासाठी गावकऱ्यांनी मोकळा माळ, बंदर, जंगलात आठवडाभरात तात्पुरते निवारे तयार केले आहेत. छोट्या राहुट्या, माडाच्या झावळ्यांपासून साकारलेल्या झोपड्या, मांडव तर काही ठिकाणी आधुनिक तंबू लागले आहेत. गंमत अशी की, या तात्पुरत्या उभारलेल्या राहुट्यांना सुर्वे हाऊस, परब होम, कदम भवन, घागरे कुटी, शिर्के सदन, आजोबांची वाडी अशी नावेही दिली आहेत. करोना साथीच्या काळात देशभर गावोगावी सक्तीची गावबंदी लावलेली होती. या पार्श्वभूमीवर गाव शुद्धीकरणासाठी स्वयंप्रेरणेतून आचरा गावात अवतरलेल्या ‘गावपळणी’ने पुन्हा एकदा त्या ‘लॉकडाऊन’च्या आठवणी जागवल्या आहेत.

सामाजिक एकोप्याचे दिवस

तीन दिवस गावाबाहेर एकत्र आलेल्या ग्रामस्थांचे वेगळे जग तयार होते. विविध विषयांवर चर्चा घडतात. सामाजिक प्रश्नांवर मंथन होते. मैदानी आणि सांस्कृतिक खेळ रंगतात. यात महिलाही उत्साहाने सहभागी होतात. याबाबत प्रतिक्रिया देताना श्री रामेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी कपिल गुरव म्हणाले की, यानिमित्ताने गाव एकत्र येते. सामाजिक एकोपा, विचार रुजतो. चर्चेतून अनेक प्रश्न मार्गी लागतात.

वरवर ही जरी परंपरा वाटत असली तरी त्यामागे निसर्ग संतुलनाचा विचार आहे. हवा, पाणी, मातीच्या जीवनाची यात आस आहे. शरीर शुद्धीकरणासाठी जसे दोन दिवस लंघन केले जाते तेच काम ‘गावपळण’ करते.- प्रमोद वाडेकर, निसर्ग अभ्यासक, आचरा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The tradition of gaapalan in the village of achra near malvan amy