शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (सोमवार) कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात जाहीर सभा घेत राज्य सरकार आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेची तोफ डागली. “राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान केले, सर्वत्र ओला दुष्काळाची मागणी होत असताना कृषिमंत्री ओला दुष्काळ नाहीच आहे असं म्हणत आहेत. या गद्दारांनी ५० खोके घेऊन स्वतःचा दुष्काळ संपवला पण यांना राज्यातील ओला दुष्काळ दिसत नाही आहे.” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “सत्ता गेल्यानंतर यांना बांध कळू लागला; काही लोक केवळ फोटो काढण्यासाठीच…”- अब्दुल सत्तारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!

सध्या आदित्य ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. त्यांनी आज(सोमवार) कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेतली. “गद्दारांनी ५० खोके घेऊन स्वतःचा दुष्काळ संपवला पण शेतकऱ्यांचं काय? ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावीच लागेल.”, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा – “आम्ही अल्टिमेटमला घाबरत नाही; कोणी काचा फोडल्या, दगडं फेकली असतील तर मला…”; अब्दुल सत्तारांचं विधान!

आदित्य ठाकरे यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर देखील राज्य सरकारवर टीका केली. “महाराष्ट्रात येणारे रोजगार गुजरातमध्ये गेले. या गद्दारांची चांगली व्यवस्था केली म्हणून धन्यवाद देण्यासाठी या गद्दार सरकारने हे उद्योग गुजरातला दिले का?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. “एका गद्दाराच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळे राज्य मागे जात आहे. यांचं हिंदुत्व हे राक्षसी हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व हे रामाचं हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम असं हिंदुत्व आहे.”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.