सोलापूर : यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर ओढ दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणीसाठा ६० टक्क्यांवर स्थिरावला आहे. मागील आठवडाभरापासून हीच स्थिती दिसून येत आहे. मागील वर्षात याच कालावधीत धरण १०९ टक्के भरले होते. यंदा पाणीसाठा कमी असल्यामुळे पुढील पावसाळी हंगामापर्यंत धरणातील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, एकीकडे पावसाळ्याने निराशा केली असताना दुसरीकडे गेल्या १५-२० दिवसांपासून तापमान वाढले आहे. हे तापमान ३५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त असल्यामुळे सोलापूरकरांना उन्हाळ्यासारखा त्रासदायक अनुभव घ्यावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात शेतीपिकांसाठी पाण्याची गरज निर्माण झाली असली तरी पावसाअभावी पाणीटंचाई भेडसावत असल्यामुळे पिकांना पाणी उपलब्ध होणे कठीण झाले आहे. त्याची चिंता शेतक-यांना सतावत आहे.
हेही वाचा >>> Dussehra 2023 : धार्मिक वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवाला साताऱ्यात प्रारंभ
उजनी धरणात आजअखेर एकूण ९६.१५ टीएमसी पाणीसाठा असून पैकी उपयुक्त पाणीसाठा ३२.५० टीएमसी एवढाच उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात यंदा एकूण ५४४ मिलीमीटर एवढाच पाऊस झाला असून धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या अन्य धरणांच्या परिसरात तुलनेने मोठ्या प्रमाणावर झालेल्या पाण्यामुळे उजनी धरण कसेबसे तारले गेले आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २७ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. यातच वाढत्या तापमानाचा फटका उजनी धरणातील जेमतेम शिल्लक पाणीसाठ्याला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. तापमानवाढीमुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते.