नमिता धुरी

हवामान पूर्वानुमान यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न; अतिवृष्टी, वादळांची पूर्वसूचना आधीच मिळणार

मुंबई :  अरबी समुद्रावरून येणारी चक्रीवादळे, मुसळधार पाऊस इत्यादी हवामानविषयक घडामोडींचे पूर्वानुमान देणाऱ्या डॉप्लर रडारांची संख्या वाढवण्याचा निर्णय हवामान विभागाने घेतला आहे. पुण्यातील ‘आयआयटीएम’ संस्था भारतीय हवामान विभागाच्या सहकार्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि विरार येथे छोटे डॉप्लर रडार बसवणार आहे. येत्या पावसाळय़ात त्याचे काम सुरू होणार असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. या रडारमुळे अतिवृष्टी, चक्रीवादळे यांचे अचूक अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे.

डॉप्लर रडारद्वारे ३ ते ४ तासांचे पूर्वानुमान देता येते. मुंबईत आठ ते दहा वर्षांपूर्वी कुलाबा येथे बसवण्यात आलेले डॉप्लर रडार ५०० किमीपर्यंतच्या क्षेत्रावरील हवामान बदलांची अचूक नोंद करू शकतो. मात्र मुंबईसह आसपासच्या शहरांचा भाग असलेल्या महानगर प्रदेशात केवळ एका रडारद्वारे लक्ष ठेवले जाऊ शकत नाही. अरबी समुद्रातील चक्रीवादळे, मुसळधार पाऊस, मेघगर्जना, कमी दाबाचे क्षेत्र इत्यादींबाबतची माहिती या रडारद्वारे हवामान विभागाला मिळते. अशाप्रकारचे रडार नागपूर येथेही कार्यरत आहे. कु लाब्याच्या रडारला पूरक म्हणून गोरेगाव येथे नवीन रडार बसवण्यात आले आहे. येत्या पावसाळ्यात ते कार्यान्वित होईल. या रडारला २५० किमीपर्यंतच्या क्षेत्रावर लक्ष ठेवता येईल. समुद्र आणि जमिनीवरील घडामोडी, पाऊस इत्यादी माहिती याद्वारे मिळू शके ल.

यासोबतच पुण्याची ‘आयआयटीएम’ संस्था भारतीय हवामान विभागाच्या सहकार्याने ४ छोटे डॉप्लर रडार लावणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, विरार येथे हे रडार असतील. ८० ते १०० किमीपर्यंतच्या परिसरातील नोंदी घेण्याची या रडारची क्षमता असेल. याबाबतची औपचारिकता पूर्ण झाली असून यंदाच्या पावसाळ्यात त्याचे काम सुरू करण्याचा विचार आहे, असे होसाळीकर यांनी सांगितले.

कृषीविषयक पूर्वानुमान यंत्रे

देशभरात २०० नवी कृषीविषयक पूर्वानुमान यंत्रे बसवण्यात येणार आहेत, त्यापैकी १० महाराष्ट्रात असतील. औरंगाबाद, सोलापूर, नंदुरबार, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम, भंडारा, बुलढाणा, नागपूर, पालघर येथील कृषिविज्ञान के ंद्रांमध्ये ही यंत्रे असतील. जमिनीखालील ओलावा, तापमान, आद्र्रता, वाऱ्यांची गती, हवेचा दाब इत्यादींबाबतची माहिती दर १५ मिनिटांनी हवामान विभागाच्या पुणे येथील मुख्यालयास प्राप्त होईल. तेथून ही माहिती विविध कृषीविषयक संस्थांना पाठवली जाईल. कृषीविषयक पूर्वानुमान यंत्रांद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे हवामान विभागातर्फे  दर मंगळवारी आणि शुक्रवारी ५ दिवसांचे पूर्वानुमान तालुका आणि जिल्हास्तरावर दिले जाते. याचा फायदा शेतीच्या कामांसाठी होतो.

Story img Loader