लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक ठरणाऱ्या कशेडी घाटातील प्रवास आता करावा लागणार नाही. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याच्या एका लेनचे काम पूर्ण झाले असून गणेशोत्सवापूर्वी ही एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे घाटाचे अंतर १० मिनटात पुर्ण करणे शक्य होणार आहे.

या बोगद्यामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते रत्नागिरीतील कशेडी हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार होणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी आता अवघड वळणांच्या कशेडी घाटातून जवळपास ३० मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच अवजड वाहनांसाठी जवळपास ४० मिनिटांचा कालावधी लागतो. अवघड वळण घाटातून आहेत त्यामुळे अनेकदा अपघातांचेही प्रसंग ओढवतात पण या सगळ्याला आता उत्तम पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. शिवाय साडेसात किलो मीटर अंतर कमी होणार आहे.

हेही वाचा… “मराठा आरक्षणाबाबत २ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मुंबईकडे येण्यासाठी आणि कोकणात जाण्यासाठी असे २ स्वतंत्र बोगदे आहेत. दोन किलोमीटरच्या बोगद्याला दोन्ही बाजूचे जोड रस्ते धरून हा सगळा मार्ग ११ किलोमीटरचा आहे. या बोगद्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मोठा वेळ वाचणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कशेडी घाटातील चौपदरीकरणाचे अवघड काम या बोगद्यामुळे उत्तम पर्याय देत पूर्णत्वाकडे जात आहे. २०१८ साली या बोगद्याचे काम सुरू करण्यात आलं. डिसेंबर २०२३पर्यंत हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल, असे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठेवण्यात आल आहे.

हेही वाचा… “माणूस कापू म्हटलं की कापलाच”, भाजपा आमदार किसन कथोरेंचं विधान वादात!

महामार्ग ते बोगदा जोडणाऱ्या पुलांचे कामदेखील पूर्णत्वास गेले आहे. करोना कालावधीत हे काम रखडले होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना आता कशेडी घाटातील अवघड व धोकादायक वळणांचा प्रवास टळणार आहे. शिवाय वाहतूक कोंडी तून प्रवाशांची सुटका होणार आहे.

बुमर तंत्रज्ञानाचा वापर

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे तर खेड तालुक्यातील कशेडी दरेकरवाडीपर्यंत डोंगराच्या आतून दोन बोगदे खोदण्यात आले आहेत. कशेडी घाटाच्या खालील बाजूस बोगद्याची खोदकाम अत्याधुनिक बुमर तंत्र वापरून करण्यात आले आहे. बोगद्याची रुंदी २० मीटर आणि उंची ६.५ मीटर आहे. भोगाव, कातळी व कशेडी या तीन गावांमधून या बोगद्याचा मार्ग जातो.

बोगद्याची वैशिष्ट्ये

या बोगद्याच्या महत्त्वाच्या कामासाठी एकूण ४४१ कोटींचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला आहे. हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी होणार असून, दोन भुयारी मार्ग असतील. नियोजनानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा हा पक्का रस्ता बोगद्याच्या कामात प्रस्तावित आहे. बोगद्यात हवा खेळती रहावी यासाठीही वायूविजन भुयार बोगद्याच्या रचनेत समाविष्ट आहे. या बोगद्यात सहा ठिकाणी जोड रस्ते असून, बोगद्यात यू टर्नची व्यवस्था आहे. अपघातग्रस्त वाहनांना बाजूला तसेच बाहेर काढण्याची आपत्कालीन सुविधासुद्धा ठेवण्यात आली आहे.

हलक्या वाहनांना प्रवेश

बोगद्याची मुंबईकडे जाणारी एक लेन गणेशोत्सव काळासाठी वाहतुकीकरिता खुली करण्यात येणार आहे. सध्या यावर अवजड किंवा मोठ्या वाहनांना प्रवेश नसेल. कार, जीप, रिक्षा आणि तत्सम हलक्या वाहनांना यातून प्रवास करता येईल. गणेशोत्सव संपल्यावर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास याच मार्गावरून होईल, त्यानंतर काही दिवसांसाठी हा बोगदा बंद ठेवण्यात येईल.

माहामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसह बोगद्याच्या कामाची पाहणी केली. मुंबई कडे जाणाऱ्या लेनचे काम पूर्ण झाले आहे. वाहतुकीच्या नियमांची चाचणी करून येत्या १० सप्टेंबर पर्यंत एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्याचा प्रयत्न आहे. – रवींद्र चव्हाण, बांधकाम मंत्री

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The work of one lane of the kashedi tunnel has been completed and the lane will start before ganeshotsav dvr
Show comments