सातारा : कोयना धरणाच्या आतील दुर्गम भागातील दळणवळण सुलभ करणारा, या भागातील पर्यटनास चालना देणारा आणि भविष्यात कोकणाला जोडण्यासाठी आणखी एका मार्ग तयार करणाऱ्या कोयनेवरील केबल पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. कोयना धरणाच्या विशाल जलाशयावर केबल रचनेतून हा पूल साकारला जात असून त्याचे स्थापत्य आणि रचनेतून हा पूल एक पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित केले जाणार आहे.
सातारा जिल्ह्याचा महाबळेश्वर, जावली, पाटण तालुक्याचा भाग हा दुर्गम समजला जातो. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या, त्यातील घनदाट झाडी आणि याच भागात साकरेलल्या कोयना जलाशयामुळे हा संपूर्ण परिसर दुर्गम बनलेला आहे. कोयना जलाशयामुळे तर या भागातील दळणवळण हे असून नसल्यासारखेच आहे. अनेक गावातील ग्रामस्थांना संपूर्ण धरणास वेढा घालत आजवर प्रवास करावा लागत आहे. या स्थानिक नागिरकांचे दळणवळण सुलभ करणे आणि या भागातील निसर्गाचा फायदा घेत पर्यटन वाढ करण्याच्या उद्देशाने हा नवा केबल पूल अस्तित्वात येत आहे.
सातारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्वर उपविभागाच्या वतीने टी अँड टी इन्फ्रा लि या ठेकेदाराकडून हे काम करण्यात येत आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या या ‘केबल ब्रिज’चे काम सध्या गतीने सुरू आहे. यासाठी मोठमोठी यंत्रसामग्री धरणाच्या पाण्यात कार्यरत आहे. तापोळा ते अहिर (ता. महाबळेश्वर) दरम्यान कोयना पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयावर या पुलाचे काम सुरू आहे. या पुलासाठी १७५ कोटींची तरतूद केली आहे.
या पुलाच्या बांधकामामुळे दुर्गम कांदाटी खोरे जोडले जाणार आहे. कुंभरोशी, कळमगाव, तापोळा, अहिर रस्ता जोडला जाणार असून, यामुळे या भागातील अनेक गावांना पडणारा मोठा वळसा कमी होणार आहे. त्यामुळे वेळ, इंधन आणि खर्चात बचत होणार आहे. पुढच्या टप्प्यात या मार्गानेच थेट रत्नागिरी जिल्ह्यातही उतरता येणार आहे.
या पुलाची लांबी एकूण लांबी ५४० मीटर आहे. या पुलाच्या मध्यभागी ४३ मीटर उंचीवर प्रेक्षक गॅलरीची रचना केली जाणार आहे. तिथे जाण्यासाठी दोन ‘कॅप्सूल लिफ्ट’ची सोय केली जाणार आहे. उंचीवर असलेल्या या गॅलरीमध्ये पोहोचल्यावर पर्यटकांना कोयनेचा विशाल जलाशय, सह्याद्रीच्या डोंगररांगा, जंगल यांचा नयनरम्य देखावा अनुभवता येणार आहे. या मुळे या भागातील पर्यटन विकासालाही वेग येणार आहे. रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
या नव्या केबळ पुलामुळे या भागाचे दळणवळण सुलभ होणार असून पर्यटनास चालना मिळणार आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र या माध्यमातून जोडले जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून या परिसरात हे काम सुरू आहे.- मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री
या पुलामुळे तापोळ्याच्या वैभवात भर पडली आहे. ‘मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तापोळ्याचा पर्यटन विकास अजून गतीने होणार आहे. यातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती वाढणार आहे.- आनंद धनावडे, अध्यक्ष, शिवसागर बोट क्लब, तापोळा