सांगली : तुझ्यात आठवणी सोबत जगत राहील, पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही, असा संदेश देऊन वारणेच्या पुरात उडी घेतलेल्या तरुणाचा शोध बचाव पथकाने रविवारी सायंकाळी थांबवला. शनिवारी दुपारी त्यांने मांगले-सावर्डे पुलावरून नदीच्या पात्रात उडी मारली होती. ७२ तासांच्या शोध मोहिमेनंतर तो आढळला नाही.
शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील मांगले आणि सावर्डे बंधार्यावरून तुषार पांढरबळे (वय २४) या तरुणाने मोबाईलला स्टेटस ठेवून नदीत उडी मारली आहे. शनिवारी ही घटना घडल्यानंतर रविवारी दिवसभर एनडीआरएफच्या पथकामार्फत तीन बोटींच्या मदतीने पूलापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बेपत्ता तरुणाचा तपास लागला नाही. यामुळे सायंकाळी ही मोहीम थांबविण्यात आली.
हेही वाचा – जि. प. भरती : उमेदवारांनो, असे झाल्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.
तुषार हा मूळचा बिळाशीचा आहे. तो मांगले येथे आजोळी आईसह रहात होता. एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. उडी मारण्यापूर्वी काही तास अगोदर त्याने मोबाईलच्या स्टेटसला मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी झोकून दिले. कुठेही सापडणार नाही. तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही, असा मजकूर ठेवला होता.
मांगले सावर्डे बंधार्याकडे तुषार पांढरबळे गेला. बंधार्यावर बराच वेळ मोबाईलवर कोणाशी तरी बोलणे सुरू होते. त्याने नदीत उडी मारली. त्याठिकाणी मासेमारी करणार्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे न ऐकता त्याने उडी मारली. त्यानंतर तो नदीच्या पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला.
मांगल्याचे पोलीस पाटील संजय कांबळे यांनी घटनेची माहिती शिराळा पोलीस ठाण्यात दिली. बचावासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. शनिवारी दुपारपासून शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, त्याचा शोध लागला नाही.