संगमनेर : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे महालक्ष्मी मंदिरात जबरी चोरीची घटना उघडकीस आली. मंदिरातील ५१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन किलो चांदी असा साधारण पंचवीस लाखांचा ऐवज यात चोरीला गेला. आजच्या बाजारभावानुसार याचे मूल्य कितीतरी अधिक आहे. चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्हीचे चित्रण साठा असलेला डीव्हीआर देखील चोरून नेला. या जबरी चोरीचा तपास लावण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
काल, शनिवारी रात्री साडेआठ ते आज, रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. मंदिराचे पुजारी सावळेराम कोंडाजी झुरळे ( राहणार काकडवाडी) यांनी यासंदर्भात आज संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, नेहमीप्रमाणे रात्री साडेआठ वाजता मंदिर कुलूप बंद केले. पहाटे साडेचारला काकड आरती साठी मंदिर उघडण्यास गेल्यानंतर मंदिराचे कुलूप तोडलेले दिसले. देवींच्या मूर्तीला घातलेले सोन्या चांदीचे दागिने गायब झालेले होते. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलिस उपनिरीक्षक शालोमन सातपुते, अशोक मोकळ हे घटनास्थळी पोहोचले. ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. महालक्ष्मी देवींचे मूर्तींना घातलेले विविध प्रकारचे सोन्या-चांदिचे दागिने, चांदीचे टोप, सोन्याचे पान, नेकलेस, मंगळसूत्र, नथणी, चांदीचा कंबरपट्टा आदी दागिन्यांची चोरी झाली आहे. एकूण २४ लाख ९४ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले. आजच्या बाजार भावानुसार या दागिन्यांची किंमत दुपटीहून अधिक होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी स्वतः घटनास्थळी जात चोरी बाबत सविस्तर माहिती घेतली. परिसरातील नागरिकांचे श्रद्धा दान असलेल्या मंदिरातील या धाडसी चोरीचा तपास लावण्याचे मोठ्या आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
डीव्हीआर देखील चोरीला
लोक श्रद्धेपोटी मंदिरांमध्ये जमेल तसे रोख अथवा दागिने स्वरूपात दान करत असतात. हा सगळा कष्टकऱ्यांच्या घामाचा पैसा असतो. यापूर्वीही तालुक्यातील अकलापूर येथील दत्त मंदिराचा सोन्याचा कळस चोरून येण्याची घटना घडली होती. चोरांना वचक बसावा म्हणून बहुतेक मंदिरात आता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. काकडवाडी च्या मंदिरात देखील सीसीटीव्ही कॅमेरा होता परंतु त्याचा डीव्हीआर चोरट्यांनी चोरून नेला. यावरून चोरट्यांनी देखील आता चोरीच्या पद्धतीत बदल केल्याचे लक्षात येते.