भरदुपारी बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न तरुणाने केला. वेळीच सावध झालेल्या महिलेच्या धाडसामुळे चोरटय़ाने ३ हजार रुपये घेऊन पळ काढला. शहराच्या प्रगतीनगर भागात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास किशोर कुलकर्णी यांच्या घरी हा प्रकार घडला.
किशोर कुलकर्णी हे आरोग्य विभागात नोकरी करतात. दुपारी चारच्या सुमारास ते मुलांना शिकवणीला सोडतात. त्यांची पत्नी सपना याच वेळी शाळेतून घरी येतात. या वेळी पती घरी नाहीत, हे त्यांना माहीत होते. मात्र, घराचा दरवाजा उघडून आत गेल्यानंतर काही वेळातच मुख्य दरवाजावर टकटक झाली. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला. या वेळी पंचविशीतील तरुण तोंडाला कपडा व डोळय़ाला गॉगल लावून आत शिरला. त्याने कडी लावून घेतली. हातात पिस्तूल दाखवून तातडीने पसे द्या, गोळी झाडण्यास भाग पाडू नका, असा दम भरला.
सपना कुलकर्णी यांना कोणी तरी नात्यातील व्यक्ती गंमत म्हणून हा प्रकार करीत असेल असे वाटले व त्यांनी तुला पसे दिले जातील. आधी तोंडावरील कपडा तरी काढ, म्हणून त्याच्या तोंडाला हात लावला. त्यावर त्याने सपना कुलकर्णी यांना ढकलत दुसऱ्या खोलीतील कपाटाची किल्ली मागितली व आत गेल्यानंतर पुन्हा कडी लावली. कुलकर्णीना हा प्रकार गंभीर वाटला. त्यांनी त्यास कपाटात अजिबात पसे नाहीत जे आहेत ते बाहेर आहेत, असे सांगितले. त्याच दरम्यान सपना कुलकर्णीचे पती दरवाजाजवळ आले व कोण आहे म्हणून आवाज दिला, तेव्हा त्यांनी घरात चोर शिरल्याचे सांगितले. या दरम्यान चोर खोलीच्या बाहेर पडला व पर्समधील ३ हजार रुपये रोख, मोबाईल घेऊन पसार झाला.
घराच्या छतावरून शेजारच्या घरावर उडी मारत असताना त्याच्याकडील पिस्तूल खाली पडले. ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्यासह पोलीस घटनास्थळी आले. चोरटय़ांनी धाक दाखवण्यासाठी आणलेले पिस्तूल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, अशा पिस्तुलामुळे मोठा आवाज होतो. आत छर्रा असेल तर त्यामुळे जखमही होते, असे त्यांनी स्पष्ट केले. भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवण्याचे धाडस चोरटय़ांमध्ये आल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटेदरम्यान शहराच्या गुळमार्केट ते कव्हारस्ता परिसरातील ४ दुकाने चोरटय़ांनी फोडली. या वेळी साडेपाच लाखांचा माल चोरटय़ांनी लंपास केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Story img Loader