गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या व राज्य सहकारी बँकेने लिलावाद्वारे विक्रीला काढलेल्या बार्शी तालुक्यातील वैरागच्या संतनाथ सहकारी साखर कारखान्यातील सुमारे दोन कोटींची यंत्रसामुग्री चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लिलाव प्रक्रियेसाठी पाहणीस गेलेल्या राज्य सहकारी बँकेच्या पथकाच्या निदर्शनास हा चोरीचा प्रकार आल्यानंतर वैराग भागात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
कर्जाचा डोंगर असलेल्या संतनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेची विक्री करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अलीकडेच घेतला आहे. त्यानुसार कारखान्याच्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विक्रीच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या मंडळींना या कारखान्याची मालमत्ता दाखविण्यासाठी राज्य बँकेचे पाहणी पथक आले होते. परंतु या पाहणीच्यावेळी कारखान्यातील अभियांत्रिकी व उत्पादन विभागातील यंत्रसामुग्री जागेवर नसल्याची बाब उघडकीस आली. अनेक वर्षांपासून संतनाथ साखर कारखान्याची मालमत्ता राज्य बँकेच्या ताब्यात आहे.
१९८०-८१ साली दिवंगत नेते माजी खासदार तुळशीदास जाधव यांनी वैराग येथे भोगावती सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली होती. परंतु जाधव यांना कारखान्याचा कारभार करता न आल्यामुळे नंतर केवळ पाच वर्षांतच हा कारखाना त्यांच्या ताब्यातून गेला. नंतर बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या गटाने कारखान्यावर वर्चस्व मिळविले. तरीही भोगावती साखर कारखान्याचे ‘भोग’ संपले नाहीत. दरम्यान, ‘भोगावती’ नामांतर होऊन ‘संतनाथ’ या नावाने कारखाना ओळखला जाऊ लागला. २००९ अखेर या कारखान्यावर राज्य शिखर बँकेच्या कर्जाची थकबाकी १७ कोटी २७ लाख ५० हजारांएवढी होती. या थकबाकीपोटी बँकेने २०११ साली कारखान्याची संपूर्ण मालमत्ता घेतली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा