“सध्याचा राजकारणाचा प्रांत मोठा झाला आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने वाद केले जात असतात. मी एक भगवद्गगीतेवर विश्वास ठेवणारी अस्तिक आहे. त्यामुळे जे गेलेले आहेत, त्यांचा शोक करायचा नाही. आपल्यातून जे दुसरीकडे गैरसमजातून गेले असतील, त्यांचे गैरसमज दूर होतील आणि पुन्हा एकदा नदीचा प्रवाह सुरू होईल.”, असा मला विश्वास शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
नीलम गोऱ्हे यांच्या प्रभाग क्रमांक १० मधील तब्बल साडेचार हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यचा वाटपचा शुभारंभ आज(रविवार) करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक राजू पवार यांनी केले होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नीलम गोऱ्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता, सध्याच्या राजकीय घडामोडीवर भूमिका मांडली.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, “त्या सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य होईल तेव्हा करावा, कायदा नेमका काय आहे ते सर्वच न्यायालय सांगत असते. पण आम्ही सांगतो तो कायदा अशा पद्धतीने जर कोणाचा अविर्भाव असेल तर तो फार काळ काही टिकत नाही हा माझा अनुभव आहे.” असे सांगत त्यांनी भाजपा नेतृत्वावर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच “धाराशिव, संभाजीनगर हे नामांतर हे जनमानसात रुजलेले विषय आहेत. याबद्दल अल्पमत बहुमत याचा विचार करायचा नसतो. त्यामध्ये जनतेच्या मनाचा विचार करायचा एवढच लक्षात ठेवाव.” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
काही लोकांनी आताच पळ काढला –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या मंत्रिमंडळाबाबत नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मी तर म्हणेल संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांचे मंत्रिमंडळ आहे. असे म्हणताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, तुमचं ( पत्रकार) आणि माझ देखील मंत्रिमंडळ होऊ शकते. त्यामुळे जनतेमधून निवडून आलेल्या सर्वांना एक आस लागून राहिलेली आहे. अशा वेळेला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर, आठ-दहा दिवसांनी चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच त्यावर भाष्य करण योग्य राहील. त्याचबरोबर काही लोकांनी आताच पळ काढलेला दिसत आहे. त्यांच्या मनात काय आहे. हे सर्व जनतेला माहिती आहे. तरी माझ्या प्रत्येकाला शुभेच्छा आहेत, असंही त्या म्हणाल्या.
पाहा व्हिडीओ –
ताईच्या आपण लक्षात राहाव हाच, या मागील हेतू असणार –
बंडखोर आमदाराना उद्देशून त्या पुढे म्हणाल्या की, “बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून जल्लोष करतात, त्यांच्या निष्ठेबाबत मी काय बोलणार.” तसेच, “जे आज माझ्यावर टीका करतात, त्यांना जर परत कधी यायचं असेल, तर ताईच्या आपण लक्षात राहाव हाच, या मागील हेतू असणार.” असल्याचं सांगत टीका करणार्यावर त्यांनी निशाणा साधला.
राजकारणात जर तर या गोष्टीला काही अर्थ नसतो –
पुण्यातील आजीमाजी तब्बल दोन हजार पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबईत भव्य सत्कार करणार आहेत. त्यानंतर अनेक त्यांच्या गटात जातील, असे काल उदय सामंत म्हणाले होते. त्या प्रश्नावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “राजकारणात जर तर या गोष्टीला काही अर्थ नसतो. जे अंतःकरण आणि मनापासून आपले असतात, ते आपलेच असतात. त्यामुळे राजकारणात कोणाला काय करायचे, तो प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु ज्यांची दिशाभूल झाली आहे. अशा लोकांची हळूहळू फार मोठी संख्या होईल आणि त्याची सर्वाना जाणीव होईल.”
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती –
शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. तो वाढदिवस रक्तदान शिबीर आणि अन्य उपक्रमामधून साजरा केला जातो. त्यानुसार सर्वांनी वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर यंदा देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती आणि प्रेमरुपी असा मोदक बाप्पा चरणी अर्पण करणार आहोत, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.