अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीने अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे अजित पवारांनी भाजपाला समर्थन दिलं आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चव्हाण यांच्या दाव्यानंतर भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी थेट विधान केलं आहे.
भाजपाने अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला आहे. त्यामुळे अजित पवार भाजपाबरोबर गेले, या पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाबाबत विचारलं असता संजय काकडे म्हणाले, “अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाबाबतची महत्त्वाकांक्षा कुणापासून लपली नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे अजित पवारांच्या वरिष्ठांशी वाटाघाटी झाल्या असतील, तर ते मुख्यमंत्री होतील. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काय होतंय? हे आपल्याला पाहावं लागेल. अजित पवार गट युतीत सामील झाला असला तरी आगामी निवडणुकीत कुणाला किती जागा मिळतात आणि कोण किती जागा निवडून आणतंय, यावर सगळी आकडेमोड अवलंबून आहे.”
“आम्ही बिहारमध्ये नितीश कुमारांची कमी लोक निवडून येऊनही त्यांना मुख्यमंत्री केलं होतं. कारण त्यांनी आम्हाला लोकसभेला खूप चांगलं सहकार्य केलं होतं. एकनाथ शिंदेंकडेही कमी आमदार असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं. याआधीही मायावतींचे आमदार कमी असूनही भाजपाने मायावतींना अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे अजित पवार आणि आमच्या नेतृत्वामध्ये काही ठरलं असेल तर ते नक्की मुख्यमंत्री होतील,” असं संजय काकडे यांनी नमूद केलं.
हेही वाचा- “…म्हणून अनेक आमदार परत येतील”, अजित पवारांच्या विधानाचा उल्लेख करत रोहित पवारांचा दावा
“खरं तर, ज्याचे आमदार जास्त निवडून येतील, तोच मुख्यमंत्री व्हायला हवा. पण काही वेळा असे प्रसंग येतात की पक्षश्रेष्ठींना वेगळे निर्णय घ्यावे लागतात. पक्षश्रेष्ठींनी तसा शब्द अजित पवारांना दिला असेल तर ते नक्की मुख्यमंत्री होतील. अजित पवारांचं संपूर्ण महाराष्ट्रात चांगलं नेटवर्क आहे. याचा भाजपाला नक्कीच फायदा होईल. वरिष्ठांनी शब्द दिला असेल अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत मला काहीही गैर वाटत नाही,” असंही संजय काकडे म्हणाले.