मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचे नेते छगन भुजबळ व गोपीनाथ मुंडे यांनी विरोध केल्यास त्यांना राजकारणातून हद्दपार करू, असा इशारा छावा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या भूमिकेबद्दलही त्यांनी आक्षेप घेतले. मराठा आरक्षणाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून नाशिक ते मुंबई अशी दिंडी काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यापूर्वी शिवराज्य संघटनेचे विनायक मेटे यांनी सर्व मराठा संघटनांना एकत्र आणून मराठा आरक्षणाच्या विषयावर लढा देण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, कालांतराने हा विषय गुंडाळून त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधान परिषदेचे सदस्यत्व मिळविण्यात धन्यता मानली. या प्रश्नावर मेटे यांनी काही दिवसांपूर्वी टिप्पणी केली होती. त्यावरून छावा संघटनेने मेटे यांचे पुतळे जाळण्याचे आंदोलन केले होते. पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित झाल्यावर मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलण्याचा मेटेंना कोणताही अधिकार नसल्याचे जावळे यांनी सांगितले. या प्रश्नावर त्यांनी सकारात्मक अथवा नकारात्मक काहीही बोलू नये. या विषयावर पुन्हा त्यांनी काही वक्तव्य केले तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा जावळे यांनी दिला. दिंडीच्या उद्घाटन सोहळ्यास रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.

Story img Loader