गेल्या वर्षभरात राज्यात दोन राजकीय भूकंप झाले. पहिल्या भूकंपामुळे राज्यात सत्ताबदल झाला तर दुसऱ्या भूकंपामुळे सत्ताविस्तार झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिंदेसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर गद्दार आणि खोके म्हणून टीका करण्यात आली. आता अजित पवारांना गद्दार म्हणून दाखवा, असं आव्हानच शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिलं आहे. ते मुंबईत बोलत होते.

उदय सामंत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रम केलाच. पण अजित दादांनी तर कार्यक्रम फिटच करून टाकला. आता आमदारांना गद्दार म्हणण्याचा, खोके म्हणण्याचा अधिकार नाही. परवा मी पत्रकार परिषदेत सांगितलं, तुम्ही ज्या तोंडाने आम्हाला गद्दार म्हणता, आम्हाला खोकेवाले म्हणता, तुमच्यात दम आहे तर अजित पवारांना गद्दार म्हणून दाखवा.”

हेही वाचा >> सात तास ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर आमदाराने केला लोकल प्रवास, मुंबईकरांच्या स्पिरीटचं कौतुक करत म्हणाले…

“(अजित पवारांना गद्दार) कोणी म्हणणार नाही. कारण अजित पवारांची तेवढी ताकद आहे. महाविकास आघाडीसाठी अजित पवारांनी कामकाज केलं होतं. आज महाविकास आघाडी भविष्यात नेतृत्त्व देऊ शकत नाही. गतिमान विकास करू शकत नाही, नरेंद्र मोदीच गतिमान विकास करू शकतात. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा विकास करू शकतात, हे पत्रकार परिषदेत सांगून त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे मी अजित दादांना धन्यवाद देतो. कारण आम्हाला जे गद्दार गद्दार म्हणायचे ते तुमच्या प्रवेशामुळे बंद झाले. त्यामुळे तुमचा नागरी सत्कार करतो”, असं अजित पवार म्हणाले.

“त्या पलिकडची गोष्ट सांगतो. आम्ही बाहेर पडलो तर आम्ही खोकेबाज. आम्ही गद्दार, आम्ही रेडे. परवा विधानसभेत पाहिलं, जे महाविकास आघाडीतून बाहेर पडले, उपमुख्यमंत्री झाले, त्यांचा सत्कार करण्यासाठी काहीजण पुष्पगुच्छ घेऊन गेले. कोणी बोंबाबोंब करूदेत, आपलं सरकार गतिमान काम करतंय यावर आता शिक्कामोर्तब झालंय”, असा टोलाही उदय सामंत यांनी लगावला.

Story img Loader