महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांचे निलंबन करून चौकशी करावी तसेच संपूर्ण महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केली.
महाराष्ट्र सदन हे बांधकाम करण्याच्या ठेक्यापासूनच वादग्रस्त आहे. भाजपचे किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात आरोप केले होते. त्यामुळे सदनाच्या बांधकामापासून आता नेमलेले ठेकेदार यासर्व कारभाराची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यापूर्वी याच सदनात मराठी कलावंतांना नकार देण्यात आला होता. मराठी माणसांना सदनाचा उपयोग होणार नसेल, तर त्याचे नाव बदलून तिथे लॉजिंग बोर्डिंग करा, असेही ते म्हणाले. सदनातील मुस्लिम कर्मचाऱयाचा रोजा तोडण्याचा शिवसेनेचा इरादा नव्हता, असे सांगताना ठाकरे यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग विरोधी पक्ष देत असल्याचा आरोप केला. दरम्यान, नाशिक विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. माजी मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्र गावित आणि धुळे येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश महाले यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.