महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील मच्छीमारांसह या व्यवसायावर उपजीविका असलेल्या लाखो कुटुंबांची होणारी उपासमार लक्षात घेऊन गेल्या १८ जानेवारीपासून सुरू असलेले बेमुदत मासेमारी बंद आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा, ‘नॅशनल फिश वर्क्‍स फोरम व महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी वेसावे येथे जाहीर सभेत बोलताना केली. मात्र जर येत्या तीन दिवसांत डिझेलच्या दरात पूर्ण कपात केल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले नाही तर मुंबई, कोकणासह देशातील दहा सागरी राज्यांत मच्छीमार आपल्या कुटुंबीयांसमवेत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे.
खासगी उद्योगसमूह, महामंडळे याप्रमाणेच मच्छीमार सहकारी संस्थांची गणना घाऊक डिझेल खरेदीदार म्हणून केल्याने १७ जानेवारीपासून प्रतीलिटर ११ रुपये ६२ पैसे एवढी प्रचंड वाढ केली. यामुळे मच्छीमारांमध्ये असंतोष पसरला. या अन्याय्य दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती व नॅशनल फिश वर्क्‍स फोरम यांच्या वतीने १८ जानेवारीपासून बेमुदत मासेमारी बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोइली यांनी या आंदोलनाची दखल घेऊन मच्छीमार सहकारी संस्थांची गणना घाऊकऐवजी किरकोळ डिझेल खरेदीदार करून त्यांना डिझेलच्या वाढीव दरात पूर्ण सूट देण्याचे १ फेब्रुवारीला नवी दिल्ली येथे जाहीर केले; परंतु यानंतरच्या पाच दिवसांत याबाबतचा आदेश तेल कंपन्यांनी न काढल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या संदर्भात आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी मंगळवारी         वेसावे बंदरावर महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि मच्छीमारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस मार्गदर्शन करताना कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी वरीलप्रमाणे इशारा दिला. या वेळी काँग्रेसचे खासदार गुरुदास कामत म्हणाले की, डिझेलच्या दरात झालेल्या दरवाढीचा प्रश्न वेसावेकरांनी गेल्या १८ जानेवारीलाच आपल्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर आपण लगेचच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय कृषिमंत्री शरदराव पवार, पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोइली, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणून दिला असून, मच्छीमारांना डिझेलच्या वाढीव दरामध्ये संपूर्ण सूट मिळेल, असा आशावाद खा. कामत यांनी व्यक्त केला. वेसावे येथे झालेल्या या जाहीर सभेच्या व्यासपीठावर राज्यातील नरेंद्र पाटील, लीओ कॉलॅसो, अमजद बोरकर, लतीफ महालदार, किरण कोळी, मोतीराम भावे, उज्ज्वला पाटील, राजश्री भानजी, मोरेश्वर पाटील तसेच राज्यातील मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा