शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली पक्षबांधणी जोरात सुरू केली आहे. राजकारणात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य करत राज ठाकरेंनी “राजकारणात मी असा व्यभिचार करणार नाही”, असं काल (१३ जुलै) कोकणात ठणकावून सांगितलं.. दरम्यान, आजही त्यांनी याबाबत वक्तव्य केलं. राज ठाकरे कालपासून (१३ जुलै) कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते दापोलीत असून त्यांनी येथील पत्रकारांशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले, “या राजकीय घडमोडींच्या पार्श्वभूमीवर हा कोकण दौरा नियोजित केलेला नाही. त्याआधीच हा कोकण दौरा ठरला होता. पक्षसंघटनेत काही बदल करायचे होते. ते बदल झाले. या बैठकांतून आता कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.”
“निवडणुकीच्या आधी कोणाबरोबर युती करतात, मग निकाल लागल्यानंतर कोणाबरोबर जाता? मतदारांची अशी प्रतारणा माझ्याकडून होणार नाही. सगळे असंच करायला लागले तर महाराष्ट्राला भवितव्यच उरणार नाही. असं व्यभिचारी राजकारण मी करणार नाही. मला जमत नाही. याला राजकारण म्हणत असतील तर मी त्या राजकारणासाठी नालायक आहे”, असंही राज ठाकरे म्हणाले.
गेल्या १७ वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग रखडलेला आहे. याचा कोकणवासियांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यावरून राज ठाकरे म्हणाले की, “कोकणातील जनतेने या गोष्टींचा विचार करणे गरजेचं आहे. त्यांच्या शांत बसण्याने अशी परिस्थिती निर्माण होतेय. एक हायवे बांधायला १७ वर्षे लागत असतील, असं कुठे होतं का? पूल वगैरे बांधून राम १२ वर्षांनी वनवास करून परत आले होते. हा तर रस्ता आहे. तोही १७ वर्षांत होऊ नये?” असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
मनसे लोकसभा निवडणूक लढवणार
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार जाहीर करणार असल्याचंही राज ठाकरेंनी आज स्पष्ट केलं. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीही सुरू झाली असल्याचं ते म्हणाले.