मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपाबरोबर जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवारांचा बंड मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, अशी चर्चा सुरू आहे.
या घडामोडीनंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवारांचा कथित बंडखोरी आणि शरद पवारांचा राजीनामा या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आम्ही भाजपाबरोबर गेलो तरच अजित पवार भाजपाबरोबर जातील, असं वक्तव्य झिरवळ यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “मी नाव घेत नाही, अन्यथा मला…”, बाजार समितीच्या निवडणुकीबाबत अजित पवारांचं विधान
अजित पवारांची कथित बंडखोरी आणि शरद पवारांचा राजीनामा या दोन घटनांवर भाष्य करताना नरहरी झिरवळ म्हणाले, “अजित पवार भाजपबरोबर जाणार, हे प्रकरण शरद पवारांच्या राजीनाम्याच्या आधी एक-दीड महिन्यांपासून सुरू होतं. याचा प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने अर्थ लावला. त्यानंतर अजित पवार पक्षातून बाहेर जायला नको, म्हणून शरद पवारांनी राजीनामा दिला, असं काही लोक म्हणतात. पण त्याच्यात कुठेही तथ्य नाही.”
हेही वाचा- “…तर १६ आमदार अपात्र ठरतील”, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी विधानसभा उपाध्यक्षांचं मोठं विधान!
“मुळात अजित पवार हे भाजपात जाणार नव्हते. आम्ही गेलो तरच अजित पवार भाजपाबरोबर जातील. आम्हालाच जर माहीत नसेल की अजित पवार जाणार की नाही? तर तुम्ही-आम्ही अजित पवारांवर का शंका घ्यावी? लोक अशा पद्धतीने तर्क-वितर्क लावत असतात. पण दोन्ही घटनांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. इतर काही आमदार, खासदार आणि पदाधिकारी यातील कुणीही भाजपात जायला इच्छुक होते किंवा नव्हते, म्हणून शरद पवारांनी राजीनामा दिला, असं काहीही झालं नाही,” अशी प्रतिक्रिया झिरवळ यांनी दिली.