गुन्ह्य़ांचा लवकर तपास, आरोपींना झालेल्या शिक्षेचे प्रमाण व त्यासाठी केलेले प्रयत्न या आधारांवरच यापुढे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुयोग्य वेतनवाढ आणि पदोन्नती ग्राह्य़ धरली जाणार आहे. पोलीस दल अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
खटल्यांची संख्या प्रचंड असल्याचे कारण पोलीस दलात वेळोवेळी पुढे केले जाते. शिक्षेचे खालावलेले प्रमाण आणि ढिसाळ तपास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सहायक पोलीस आयुक्त/उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यापासून ते युनिट प्रमुखापर्यंतच्या (पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त) यांना गंभीर प्रकरणांचा अपवाद वगळता प्रत्यक्ष तपास करावा लागत नाही. आरोपींची लवकरात लवकर अटक, पुरावे गोळा करणे, आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी कायदेशीर बाबी भक्कम करणे या दृष्टीने अधिनस्थ तसेच तपास अधिकाऱ्याला मार्गदर्शन तसेच त्याचा पाठपुरावा करणे त्यांची जबाबदारी असते. मात्र, असे असले तरी मध्यंतरीच्या काळात शिक्षेचे प्रमाण कमी झाले. संवेदनशिल प्रकरणांमध्येही गुन्हेगार निर्दोष सुटण्याचे प्रमाण वाढले. परिणामी गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले.
‘चलता है’ वृत्तीमुळे वरिष्ठांचे दुर्लक्ष झाले. विविध गुन्ह्य़ातील तपासात होत असलेला उशीर, गुन्ह्य़ातून आरोपींच्या सुटकेचे प्रमाण वाढत आहे. तपासात ढिसाळपणा आल्याने असे घडू लागले. हे शैथिल्य दूर व्हावे, जबाबदारीची जाणीव व्हावी या दृष्टीने सहायक पोलीस आयुक्त/उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यापासून ते पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्तांचा वार्षिक गोपनीय अहवाल यापुढे गंभीरतेने तपासला जाणार आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा वार्षिक गोपनीय अहवाल यापुढे गंभीरतेने घेण्याचे पोलीस दलाच्या वरिष्ठ पातळीवर ठरविण्यात आले आहे. गुन्ह्य़ांचा लवकर तपास, आरोपींना झालेल्या शिक्षेचे प्रमाण व त्यासाठी केलेले प्रयत्न या आधारांवरच यापुढे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुयोग्य वेतनवाढ आणि पदोन्नती ग्राह्य़ धरली जाणार आहे. राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी १४ जानेवारीला एक परिपत्रक सर्व युनिट प्रमुखांना पाठविले आहे. पोलीस महासंचालकांच्या निर्णयाची माहिती त्यात दिली असून अर्धवार्षिक बैठकीत पोलीस महासंचालकांनी यासंबंधी दिशानिर्देश दिले असल्याची जाणीव करून देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
यासंदर्भात राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना संपर्क साधला असता त्यांनी असे परिपत्रक निघाल्यास दुजोरा दिला. या परिपत्रकात नक्की काय आहे, हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच अधिक बोलता येईल, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा