रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा झाला आहे. या राड्यात काही तरुणांनी पोलिसांच्या वाहनांसह काही खासगी वाहनांना आग लावली. या प्रकरानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकावर निशाणा साधला.

२ एप्रिल रोजी महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर येथे मोठी सभा आयोजित केली आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले यांची भाषणं होणार आहेत. ही सभा होऊ नये, यासाठी राज्यातलं एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तर सभा होणारच. सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात गृहमंत्र्यांचं अस्तित्वच दिसत नाही, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा- “म्हस्केंना एकच सांगतो…”, अजित पवारांवरील ‘त्या’ गौप्यस्फोटावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

संजय राऊतांच्या आरोपाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे चिथावणी दिल्यासारखं बोलत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. उद्या पुन्हा संभाजीनगरमध्ये अशी काही प्रकरणं घडली तर संजय राऊतांना आरोपी केलं पाहिजे, असं विधान बावनकुळे यांनी केलं.

हेही वाचा- “दंगलीतील काही युवकांना हैदराबादहून…”, छत्रपती संभाजीनगरमधील राड्यावर संजय शिरसाटांचं विधान

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “संजय राऊतांनी असं बोलणं हे पुन्हा एकदा चिथावणी दिल्यासारखं आहे. यापूर्वी महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या, तेव्हा आम्ही विरोधी पक्षात असताना कधीही संजय राऊतांसारखे वाहियात (निरर्थक) विधानं केली नाहीत. संजय राऊत हे ‘वाहियातपणा’ करत आहेत. महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम संजय राऊत करत आहेत.”

हेही वाचा- “तेव्हाच सोलून काढलं असतं तर…”, छत्रपती संभाजीनगरमधील राड्यावर बाळा नांदगावकरांची संतप्त प्रतिक्रिया

“खरं तर, काल अजित पवारांनी म्हटलं, महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करू नका. आपण महाराष्ट्र सांभाळला पाहिजे, असं अजित पवारांनी त्यांच्या पक्षातील लोकांना सांगितलं. अजित पवारांची भूमिका कौतुकास्पद आहे. आरोपींना शोधून काढणं हे सत्ताधारी पक्षाचं काम आहे. संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे फडणवीसांवर बोलतात, पण फडणवीसांचं रक्त तुमच्यासारखं आहे का? त्यांचं रक्त कधी सामाजिक दुरावा निर्माण करणारं नाही. ते कधीही अशा गोष्टींचं समर्थन करू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस हे खरं तर महाराष्ट्राचे भूषण आहेत. पण संजय राऊतांसारखा भोंगा सकाळी चालू होतो आणि महाराष्ट्रातील वातावरण बिघडवतो. त्यामुळे संभाजीनगरमध्ये उद्या असं काही प्रकरण घडलं तर संजय राऊतांनाही आरोपी केलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली.

Story img Loader