सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यानंतर शिंदे गट आणि भाजपातील आमदारांनी दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी करण्यात येत होती. आमदारांनी केलेल्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनीही राहुल शेवाळेंवरील बलात्काराच्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी विधानपरिषदेत केली आहे. त्यानुसार, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंनी राहुल शेवाळेंच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले. यानंतर शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी रविवारी (२५ डिसेंबर) पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करणाऱ्या महिलेचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला. या आरोपांवर पीडित महिलेनेही प्रत्युत्तर दिलं आहे. या सर्व घडमोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकारला सूचक इशारा दिला आहे.
“दिल्लीच्या भाषेत ज्यास ‘कबुतरबाजी’ म्हटले जाते अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद, पाकिस्तानचा ‘अँगल’ आला. हे गंभीर आहे. शेवाळे यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक व राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे हे कारस्थान आहे व त्यामागे शिवसेनेचे लोक आहेत. शेवाळे यांचा हा दावा खरा नाही. संबंधित महिलेसोबतचे जे चित्रण प्रसिद्ध झाले त्याचे चित्रीकरण विविध ठिकाणी याच प्रेमी युगुलाने केले आहे. येथे शिवसेनेचा प्रश्न येतोच कोठे? बाकी राष्ट्रीय तपास यंत्रणेत देशभावना जागरूक असेल तर महाराष्ट्रातील खासदारांच्या कबुतरबाजीचे प्रकरण खणून काढील व ती कोणाचीही गय करणार नाही.” असं ‘सामना’च्या अग्रलेखामधून शिवसेनेने म्हटलं आहे.
याशिवाय, “या प्रकरणात शेवाळे यांच्यासोबत इतर खासदारांचीही नावे येऊ शकतात व संबंधित महिला चौकशीत अन्य धक्कादायक खुलासे करण्याची भीती वाटते. असे खुलासे झाले तर महाराष्ट्रातील सरकारच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेलच फुटेल. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार अनैतिकतेच्या कुबडय़ांवर उभे आहेच, पण ते व्यभिचार व देशद्रोहय़ांच्या पायावरही टिकले आहे.” अशी टीकाही शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
…पण ही सर्व पश्चातबुद्धी आहे –
याचबरोबर “फुटीर गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून व खासकरून ‘एनआयए’कडून तत्काळ चौकशी व्हायला हवी. एका महिलेचे प्रकरण शेवाळे यांच्या अंगावर शेकले आहे व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा मामला आहे. नवाब मलिक यांच्यावर दाऊदसंबंधित लोकांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप ईडी-एनआयएने ठेवला व त्यांना अटक केली. त्यापेक्षा गंभीर प्रकरण संसदेचे सदस्य शेवाळे यांचे दिसते. दाऊद इब्राहिम, पाकिस्तान, आयएसआयशी संबंधित महिलेशी या खासदारांचे संबंध होते व ते संबंध सरळमार्गी नव्हते. संबंधित महिलेसोबत संसद सदस्याचे जे व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध झाले आहेत ते गंभीर तसेच अनैतिक आहेत. लिफ्टमध्ये, हॉटेलमध्ये व इतर अन्य ठिकाणी खासदार व महिलेचे घनिष्ठ नाते स्पष्ट दिसते व ते वर्णन ‘रोमॅण्टिक’ अशाच शब्दात करावे लागेल. संबंधित महिला आपल्याला आता ब्लॅकमेल करते व मी तिची तक्रार केली असल्याचे खासदारांनी सांगणे हा खोटारडेपणा आहे. मुळात अशा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संशयास्पद असलेल्या महिलेच्या प्रेमात खासदार अडकले. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती या खासदाराने त्या महिलेला पुरवली काय? हनी ट्रपमध्ये खासदार अडकले आहेत व संबंधित महिलेच्या विरोधात आपण कोठे व कशा तक्रारी केल्या याबाबत त्यांनी खुलासे द्यायला सुरुवात केली आहे, पण ही सर्व पश्चातबुद्धी आहे.” असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
पुन्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेने चालढकल केलीच तर… –
“या महिलेशी संबंधित खासदारांचे अत्यंत प्रेमाचेच संबंध होते व या महिलेस लग्नाचे वगैरे वचन देऊन खासदारांनी नाते घट्ट केले. हे नाते घट्ट होते तोपर्यंत दाऊद, पाकिस्तानशी संबंध असल्याचा साक्षात्कार खासदार महाशयांना झाला नाही. खासदार शेवाळे हे नक्कीच शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले व आता हिंदुत्व, नैतिकता, राष्ट्राभिमान अशा मुद्दय़ांवर त्यांनी शिंदे यांच्या खोके गटात प्रवेश केला, पण पहिल्या चार महिन्यांतच शेवाळे व इतरांचा नैतिकतेचा मुखवटा गळून पडला आहे. दिल्लीच्या भाषेत ज्यास ‘कबुतरबाजी’ म्हटले जाते अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद, पाकिस्तानचा ‘अँगल’ आला. हे गंभीर आहे. पाकिस्तान आले की, आयएसआयचे जाळे आले व आपल्या देशातील राजकारण्यांना अशा जाळय़ात अडकवले जाते. खासदार शेवाळे हे त्या आयएसआयच्या जाळय़ात होते काय व त्यांनी दुबई, तसेच दुबईमार्गे अन्य कोठे प्रवास केला काय? ते कोणाला भेटले व त्यांच्याबरोबर अन्य काही खासदार होते काय? या खासदारांकडून राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात गोपनीय माहिती पाकिस्तानपर्यंत गेली तर नाही ना, याची चौकशी एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने करायला हवी. पुन्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेने चालढकल केलीच तर हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या टेबलावर नेला पाहिजे. या कबुतरबाजीने देशाच्या सुरक्षेस सुरुंग लागला आहे. या सुरुंगाची दारू संसदेच्या सभागृहात पोहोचली असेल तर गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांना कठोर पावले उचलावी लागतील.” असंही शिवसेनेने म्हटलं आहे.