ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन सरकारने दिल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित केलं आहे. त्यांचं उपोषण स्थगित होताच मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी सरकारविरोधात नवा एल्गार पुकारला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाहीतर थेट मंडल कमिनशनविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिली. आज त्यांनी रुग्णालयातून पत्रकारांशी संवाद साधला.

“मराठ्यांनीही मतं दिली आहेत तुम्हाला, फडणवीससाहेब षडयंत्र हाणून पाडा. नाहीतर माझा नाईलाज आहे. एकनाथ शिंदे, फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास टाकला आहे. आरक्षण घेणार आम्ही आहेत. एकही नोंद रद्द होऊ देणार नाही. एक जरी नोंद रद्द केली तर मराठ्यांचा पुढचा लढा मंडल कमिशन रद्द करण्यासाठी असेल. आमच्या मुंडक्यावर पाय देऊन आमच्या हक्काचं असून आम्हाला खायला देणार नसतील तर इथून पुढचं आंदोलन मंडल कमिशनविरोधात असेल”, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

हेही वाचा >> “ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही”, सरकारकडून आश्वासन मिळल्यानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित!

“सगळे ओबीसी एक झाले तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार. कारण त्या नोंदी आणि गॅझेट आमच्या हक्काचं आहे. तिन्ही गॅझेट १३ तारखेच्या आत पाहिजे. फडणवीस तुम्हाला मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यायची नसेल, तुम्ही छगन भुजबळ आणि गिरिश महाजन यांना आमच्या अंगावर सोडलं असलं तरीही तुम्ही सावध व्हा. आम्ही अजूनही तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे. आम्ही अजूनही तुमचा राग राग करत नाहीत”, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मी जातीवाद करत असेन तर…

“मराठ्यांनाही सांगतो आता, काय प्रकार सुरू आहे. आपल्या हक्काचं कुणबी नोंदी आहे, आणि यांचं म्हणणं आहे की घेऊ नका. यांनी आमच्या उभ्या पिकात नांगर चालवला आहे. तुम्ही नोंदी रद्दा करा म्हणत आहात. किती वाईट विचार आहेत तुमचे. मी जातीवाद करत असेन असं मराठ्यांना वाटत असेल तर मला जाहीरपणे सांगा, मी काम सोडून देतो”, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सत्ताधाऱ्यांनी सर्व मॅनेज केलंय

“आम्हाला धक्का लागतोय. त्यांना काय धक्का लागतोय. आमचं आरक्षण आम्ही घेणार. आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार. राज्य सरकारमध्ये ओबीसी नेत्यांवर दबाव आहे. तेच आंदोलन करायला लावतात, सत्ताधारी म्हणून हे सर्व मॅनेज आहे. आमच्या आरक्षणात ते आहेत. त्यांना धक्का लागतोय की नाही हे आम्हाला माहित नाही. आमच्या ओबीसी नोंदी आहेत. हक्काच्या नोंदी आहेत. अर्ध्या तासापूर्वी पुरावे मिळाले आहेत. लाखो नोंदी सरकारने दाबून ठेवल्या आहेत. ब्रिटीश कालीन जनगणनेत मराठा कुणबी दाखवलाय. १८७१ मधले पुरावे आहेत. ते ही घेत नाहीत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.