ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे सध्या शाखा भेटी घेत आहेत. त्यानिमित्ताने आज ते धारावीत होते. यावेळी त्यांनी पुन्हा राज्यात गुंडागुर्दी सुरू असल्याचं म्हटलं. तर, तुम्ही माझ्याबरोबर राहणार आहात का, असं आवाहनही त्यांनी केलं. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या श्वानाच्या विधानावरून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धारावीत येण्यासाठी काही निमित्त नाही, निवडणुका, कार्यक्रमहीनाही. मी असं ठरवलं की शाखा शाखांना भेटी द्यायच्या. उल्हासनगर, कल्याणचा दौरा केला. प्रत्येक ठिकाणी छोटी मीटिंगच झाली. मग रायगडला गेलो, विनायक राऊतांना विचारलं आपण कुठे आहोत, ते म्हणाले शाखेत बसलो आहे. सगळीकडे गर्दीच गर्दी आहे. जिथं जातोय तिथं झुंडीच्या झुंडी रस्त्यावर येत आहेत. सरकारविरोधात असंतोष आहे. कारण त्यांनी वेगळा प्रकार शोधून काढली आहे. ईडी, आयकर विभागासह निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनाही कामाला लावलं आहे.

“विरोधकांच्या मागे काही लावून द्यायचं आणि त्यांना फोडून आपल्या पक्षात घ्यायचं. विकाऊ माल विकला गेला नाही तर हरकत नाही. मात्र माझे निष्ठावंत मावळे माझ्याबरोबर आहेत तोपर्यंत मला चिंता नाही. त्यामुळे आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच”, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

“गाडीखाली कुत्रा आला तरी राजीनामा मागाल, असं उपमुख्यमंत्री म्हणाले. पण मतं मागायला येता कशाला? त्यांच्यालेखी जनता ही कुत्र्या-मांजरासारखी असेल, तर निवडणुकीच्यावेळी मत मागायला आल्यावर जनतेला त्यांच्या पेकाटात लाथ घालावीच लागेल. तुम्हाला दिल्लीत तुमचा आवाज उठवणारा हक्काचा खासदार पाहिजे की दिल्लीत जाऊन तळवे चाटणारे खासदार पाहिजे?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then the people will have to kick them again uddhav thackerays elgar from dharavi sgk