संतप्त ओझरकरांची भावना
हत्या झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत संशयितांना अटक करणाऱ्या पंचवटी पोलिसांनी हीच तत्परता एक कोटीच्या खंडणीचा गुन्हा दाखल होताच दाखविली असती तर विपीन बाफनाचे प्राण वाचले असते. पोलिसांनी हे प्रकरण प्रारंभी फारसे गांभीर्याने घेतलेच नाही, अशी भावना विपीनच्या हत्येमुळे कडकडीत बंद पाळणाऱ्या ओझरकरांमध्ये आहे.
ओझर येथील धान्य व्यापारी गुलाबचंद बाफना यांचा एकुलता एक मुलगा विपीन दीड वर्षांपूर्वीच्या पूर्ववैमनस्यातून चुलत भावाऐवजी मारेकऱ्यांचे लक्ष ठरल्याची माहिती शनिवारी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. परंतु विपीनच्या हत्येमुळे शोकाकुल आणि या प्रकरणात पोलिसांनी प्रारंभी दाखविलेल्या ढिलाईमुळे संतप्त ओझरकर संशयित पकडले गेल्याच्या वृत्ताचे स्वागत करू शकलेले नाहीत. ओझरसह पंचवटीतील सामाजिक व राजकीय क्षेत्रात बाफना परिवारापैकी काही जण कार्यरत आहेत. या परिवारापैकी एक युवक बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या सुटकेसाठी एक कोटी रुपयाची मागणी करण्यात येते, तसा गुन्हाही दाखल करण्यात आला. हे लक्षात घेता पोलिसांकडून प्रारंभी जलद कारवाई होण्याची आवश्यकता होती. परंतु गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी विपीनच्या आवडीनिवडींशी प्रारंभी या प्रकरणाची सांगड घालत तो स्वत:हून परत येईल, असे पोलिसांकडून ओझरकरांना सांगण्यात येत होते. बाफना परिवारासही पोलीस विपीनचा नक्कीच शोध घेतील, असा विश्वास होता. एकेक दिवस जात असतानाही तपासात कोणतीच प्रगती होत नसल्याचे दिसून आल्यावर ओझरकरांचा धीर खचू लागला होता. खंडणी मागणाऱ्यांकडून फोन येणेही बंद झाले होते. शुक्रवारी मारेकऱ्यांकडून पुन्हा खंडणीसाठी फोन आला आणि त्यानंतर काही वेळातच विपीनच्या हत्येची वार्ताही ओझरकरांना मिळाली. विपीनचा मृतदेह प्राप्त झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली. पोलिसांनी केलेली कामगिरी नक्कीच दाद द्यावी अशी असली तरी हीच तत्परता ते त्यांनी गुन्हा दाखल होताच दाखविली असती तर, कदाचित विपीनला वाचविण्यात त्यांना यश आले असते, असे ओझरकरांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा