मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली घडल्या आहेत. औरंगाबाद, बुलढाणा, अकोला आणि अहमदनगर येथे दोन समुदायात हिंसाचार घडला आहे. या दंगलीमध्ये काहीजणांचा जीवही गेला आहे. अलीकडेच अकोला येथे झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पोलिसांसह अन्य आठ लोकही जखमी झाले आहेत.
अकोला दंगलप्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशी एकंदरीत स्थिती असताना प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. दंगल घडवण्यासाठी जे पुढे आले असतील, त्यांचे हात छाटले पाहिजे, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- “एकनाथ शिंदेंनी स्वत: मातोश्रीवर पैसे दिले”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा
महाराष्ट्रात विविध ठिकाणी घडलेल्या दंगलीप्रकरणी विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “दंगल करणारा कुणीही असो… मग तो हिंदू असो वा मुस्लीम असो किंवा इतर कुठल्याही जातीचा असो… जे-जे दंगल पेटवण्यासाठी पुढे आले असतील, त्यांचे हात छाटले पाहिजे. दंगलीच्या माध्यमातून शहरात अशांतता निर्माण करून विकासाला बाधा आणण्याचं काम केलं जातं आहे.”
हेही वाचा- “एकच व्यक्ती आठ जिल्ह्यांची पालकमंत्री असेल, तर…”; बच्चू कडूंचं थेट विधान, रोख कुणाकडे?
“राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात आहे. दररोज कुणी ना कुणी आत्महत्या करत आहे. औषधं मिळत नाही, म्हणून लोक मरतायत. असं असताना एकमेकांच्या विरोधात कुणी तलवारी काढत असेल आणि शहरातील शांतता भंग करत असेल, तर हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. त्यांच्याविरोधात कारवाई होणं फार महत्त्वाचं आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असला तरी कारवाई झालीच पाहिजे,” असंही बच्चू कडू म्हणाले.