गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यानंतर ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय दिला आहे. संबंधित आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे. यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटासह ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्रतेची नोटीस पाठवली आहे.
तुम्हाला अपात्र का ठरवलं जाऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या सर्वच आमदारांना पाठवली आहे. याचा आता विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्या नोटीशींवर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या चौकटीतच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी न्यायालयाच्या चौकटीबाहेर निर्णय दिला तर तो लोकशाहीला धरुण नसेल. असं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आमच्यासाठी उघडे असतील, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. ते यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा- “…तेव्हा अमित शाहांनी दिलेला शब्द पाळला नाही”, बंद दाराआड झालेल्या चर्चेवर उद्धव ठाकरेंचा खुलासा
राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदारांना पाठवलेल्या नोटीशींचा राजकीय अर्थ काय काढणार? असा सवाल विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, “त्याचा काहीही अर्थ काढायचा प्रयत्न केला तरी सर्वोच्च न्यायालयाने जो अर्थ काढून दिला आहे, त्याच्या पलीकडे कुणालाही जाता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांत निकाल दिला आहे. त्या निकालाच्या चौकटीतच विधानसभा अध्यक्षांना (राहुल नार्वेकर) निर्णय घ्यावा लागेल.”
हेही वाचा- मोठी अपडेट: नऊ आमदार वगळता सर्व आमदारांचा शरद पवारांना पाठिंबा? जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान
“त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीबाहेर निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर ते लोकशाहीला धरुण होणार नाही आणि तसं अध्यक्ष वागतील, अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. त्यांनी जर तसा निर्णय घेतला, तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आमच्यासाठी तेव्हाही उघडे असणारच आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.