“भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा कोणताही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती”, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (२० सप्टेंबर) केलं. संजय राऊतांच्या या विधानानंतर विविध टीका आणि तर्क-वितर्कानंतर आता भाजपाने “मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं?” असा सवाल उपस्थित केला आहे. आज (२१ सप्टेंबर) झालेल्या भाजपाच्या पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हा सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते.

“विधानभवनात मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझेचं समर्थन केलं होतं. वाझे म्हणजे लादेन आहेत का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. तेव्हाही मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती नव्हती असं स्पष्टीकरण पुढे देण्यात आलं. परभणीमध्ये बलात्कार झाला, काल त्या पीडित मुलीचा मृत्यू झाला. राज्यात महिला अत्याचारांच्या संख्येने परिसीमा गाठली आहे. रोज राज्यात विविध ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. आता हे तरी मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का?”, असा सवाल करत भाजपाने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.

“काहीच दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना फक्त विचारपूस करणारा फोन केला. तो देखील घटनेनंतर ५ व्या दिवशी? आता ठाणे ते मुंबई असं अंतर कितीसं आहे? म्हणूनच आम्ही प्रश्न विचारत आहोत की मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय?”, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

केशव उपाध्ये पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी तौक्ते वादळानंतर रत्नागिरीचा धावता दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये तिथल्या पत्रकारांनी काही मुद्दे मांडले. निसर्ग चक्रीवादळावेळची मदत अद्याप न मिळाल्याबाबत जेव्हा तिथे तक्रार करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मला याबाबत माहिती नाही. मी माहिती घेऊन सांगतो.’ म्हणजे राज्यातील महिला अत्याचार, पूरग्रस्तांना मदत मिळतेय की नाही? वैगरे कशाहीबाबत मुख्यमंत्र्यांना काहीच माहिती नाही?”

“सिल्व्हर, प्लॅटिनम, गोल्ड नेमकं कोण राज्य चालवतं?”

इतकंच काय तर भंडारा अग्निकांड झाल्यानंतर जेव्हा फायर ऑडिटचा विषय आला होता. तेव्हाही मुख्यमंत्री असंच म्हणाले होते. करोना काळातही प्रत्येक वेळी सगळ्या प्रश्नांवर मुख्यमंत्री हेच म्हणायचे असं केशव उपाध्ये म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत उपस्थित असताना एका कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले होते की त्यांना अर्थखात्यातलं काही समजत नाही. मग मुख्यमंत्र्यांना काय कळतं? ते राज्य कसं चालवतात? किंवा मग सिल्व्हर, प्लॅटिनम, गोल्ड नेमकं कोण राज्य चालवतं? असा सवालही भाजपाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत | राऊत

“आरोप करणाऱ्यांवर जी काही कारवाई झाली ती गृहमंत्रालयाने केली आहे. त्यामध्ये आकस आणि सूड या शब्दांचा वापर करु नये. मी पूर्ण माहिती घेतली असून गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होईल असं वाटलं. त्यातून ही कारवाई झाली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत. कोणी असे खोटे आरोप केले तर आमच्या सरकारला भोकं पडत नाहीत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Story img Loader