मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह पुण्यात आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला पुण्यात आले होते. यावेळी खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल आभारही मानले. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे आणि बृजभूषण सिंह यांच्यातील वादाबाबत सूचक विधान केलं होतं. बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंची भूमिका पटली असावी, अशा आशयाचं ट्वीट बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंतानी बाळा नांदगावकरांना टोला लगावला आहे.
मग “अयोध्या दि ट्रॅप” चित्रपटाच्या कथेचा रचेता कोण होता बरं? का ते पण नेहमीप्रमाणे मनसे? असो! भाजपाने लावलेला ट्रॅप भाजपानेच सोडवला असे दिसते! असं सचिन सावंत यांनी बाळा नांदगावकर यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे.
बाळा नांदगावकर काय म्हणाले? –
“उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी नुकताच पुणे दौरा केला, मागे यासंदर्भात आम्हाला विचारण्यात आले होते की त्यांच्या दौऱ्याला मनसे विरोध करणार का? त्यावेळी आम्ही “अतिथी देवो भव” ची भूमिका मांडली. आज त्यांनी सुद्धा अयोध्येत राज साहेबांचे स्वागत केले जाईल अशीच भूमिका मांडली. अनेकदा राजकीय भूमिका या गैरसमजुतीतून घेतल्या जातात. राज साहेब हे कधीच कोणाचाही द्वेष करत नाहीत तर प्रत्येक राज्यातील तरुणांना प्रथम प्राधान्य मिळावे केवळ एवढीच त्यांची भूमिका असते हे ब्रिजभुषण सिंह यांना देखील लक्षात आलेच असेल व त्यामुळे त्यांचा देखील गैरसमज दूर झाला असेल हे त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते.” असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
ब्रिजभुषण सिंह यांनी काय म्हटलं होतं ? –
“राज ठाकरे यांचा मी सैद्धांतिक मुद्यावर विरोध केला होता. त्यांच्याशी माझे वैयक्तिक वाद नाहीत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये कधीच दुरावा नव्हता. दोन्ही राज्यांचे आपसात प्रेम आहे. उत्तर प्रदेशमधील असंख्य लोक महाराष्ट्रात येऊन आपली उपजीविका भागवतात. माझाही कधी महाराष्ट्राला विरोध नव्हता” अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी मांडली होती..