सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे निशाणा साधला आहे.
हेही वाचा : टाटा एअर बस प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, म्हणाल्या…
सचिन सावंत म्हणतात, “देशात तीन सरकार गुजरातच्या हितासाठी कार्यरत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, दुसरे गुजरात सरकार आणि तिसरे शिंदे फडणवीस सरकार! गेल्या काही महिन्यांपासून ज्या वेगाने गुजरातकडे महाराष्ट्रात होऊ घातलेले प्रकल्प चालले ते पाहता जितका काळ हे राहतील तितका महाराष्ट्र कंगाल होईल.”
ट्वीटबरोबर सचिन सावंत यांनी एक व्हिडिओही शेअर केला असून, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की “फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीनंतर शिंदे-फडणवीस हे दुसरं सरकार आहे, गुजरातच्या हितासाठी मोदी सरकारच्या आज्ञेनुसार अतिशय समर्पित होऊन काम करत आहे. गुजरात सुजलाम, सुफलाम व्हावा यासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहे. एक मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार, दुसरं गुजरातचं सरकार, तिसरं महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार. त्यामुळे ज्या वेगाने महाराष्ट्रातील काही प्रकल्प काही महिन्यांमध्ये गुजरातकडे चालले आहेत, तो वेग पाहता जितका काळ हे सरकार राहील, तेवढ्या कालावधीत महाराष्ट्र कंगाल झाल्याशिवाय राहणार नाही, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.”
हेही वाचा : २६/११ चा हल्ला कोणीही विसरू शकणार नाही, तो दिवस सर्वांसाठी काळा दिवस होता – एकनाथ शिंदे
याशिवाय “मोदी सरकारची मागील आठ वर्षांपासूनची इच्छा पूर्णपणे स्पष्ट आहे की, देशातील सगळे प्रकल्प हे गुजरातमध्येच जावेत. परंतु महाराष्ट्राचं अहित होत असताना महाराष्ट्रातील भाजपा नेते हे शब्द उच्चारण्याची हिंमत करत नाहीत. यापेक्षा दुर्दैवाची बाब कुठली असणार नाही. महाराष्ट्राच्या अहिताच्या पापाचे वाटेकरी ते आहेत.” असा सचिन सावंत यांनी आरोप केली आहे.
पाहा व्हिडिओ –
याचबरोबर “वेदान्त फॉक्सकॉन नंतर टाटा एअर बस हा दुसरा प्रकल्प आहे, जो गुजरातमध्ये गेलेला आहे आणि महाराष्ट्रातील युवकांच्या हातातील संधी पुन्हा एकदा गेलेली आहे. परंतु उद्योगमंत्री म्हणत आहेत की सामंजस्य करार हा वर्षभरापूर्वीच झाला होता. परंतु महाराष्ट्राची दिशाभूल करू नका ही आमची विनंती आहे. कारण, हा सामंजस्य करार केंद्र सरकार आणि टाटा एअर बस यांच्यात झाला होता. गुजरात सरकारबरोबर झालेला नव्हता. म्हणूनच हा प्रकल्प जेव्हा तिकडे गेला त्यावेळी तुम्ही काय करत होता? हा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच दुसरी जाहिरात आलेली आहे की अर्सेनल मित्तल आणि निप्पोन स्टील ६० हजार कोटींची गुंतवणूक गुजरातमध्ये करत आहेत. त्याचं कारण त्या कंपनीने आपल्या जाहिरतीमध्ये स्पष्ट केलं आहे की, पंतप्रधान मोदींच्या व्हिजनमुळे आम्ही ते करत आहोत. आम्ही महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला आठवण करून देऊ इच्छितो हा ६० हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये चालला आहे, त्याचा एक प्लांट महाराष्ट्रातील तळेगाव येथे आहे.” असंही सचिन सावंत यांनी व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे.