प्रशांत देशमुख
वर्धा : महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात ग्रामोद्योगांची प्रगती सुरूच आहे. मात्र जिल्ह्यात आजही मोठय़ा उद्योगांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांच्या बेरोजगारीचा मुद्दा गंभीर बनत आहे. एकीकडे सहकार क्षेत्र विस्तारत असल्यामुळे गावे समृद्ध होत आहेत, महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या हाताला रोजगार मिळत आहे, मात्र औद्योगिकदृष्टय़ा वर्धा हा अजूनही पुरेशी प्रगती करू शकलेला नाही.
गौळावू गुरांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात प्रति दिन पाच हजार लिटर दुधाचे संकलन होते. सहकार क्षेत्र चांगले विकसित झाले असून ९५३ सहकारी संस्था जिल्ह्याचा आर्थिक आधार ठरतात. विद्युतीकरणात जिल्हा आघाडीवर असून संपूर्ण १ हजार ३७६ गावांत व सहा शहरांचे पूर्णपणे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात १३१ कारखाने असले तरी मोठा उद्योग नाही. सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा पुढारलेला जिल्हा म्हणून वर्धा सर्वत्र ओळखला जातो. शैक्षणिक संस्थांचे विस्तारलेले जाळे तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून होत असलेले कार्य जिल्ह्याच्या आधुनिक ओळखीस पुरेसे. मात्र याच शैक्षणिक संस्थांमधून निघणाऱ्या कुशल मनुष्यबळास हाताला काम मिळण्याची संधी मात्र नाही. मंत्रीपदाचे वजन वापरून तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंत साठे यांनी वर्धेत पोलाद प्रकल्प आणला. तसेच हिंगणी व केळझर येथे स्फोटकांच्या निर्मितीचे कारखाने सुरू झाले. पोलाद प्रकल्पात धुगधुगी तर उर्वरित दोन प्रकल्प बंद पडले. बेरोजगारी कायम राहिली.
आंजनसरा व कार प्रकल्प कागदावरच
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर लगेच बोर सिंचन प्रकल्प उभा झाला. मात्र अद्यापही या प्रकल्पाच्या पाण्याचा पूर्णतेने उपयोग होऊ शकला नाही. आंजनसरा व कार प्रकल्प कागदावरच आहे. सिंचन सोयी पुरेशा नसल्याने कोरडवाहू शेतीचाच आधार शेतकऱ्यांना आहे. त्यावर नेहमी नैसर्गिक आपत्तीचे सावट असते. परिणामी ही कोरडवाहू शेती शेतकऱ्यांना दारिद्र्यात लोटणारी ठरली. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी वर्धा जिल्ह्याची करुणादायी ओळख तयार झाली. हे बदलायचे असेल तर पर्यावरणपूरक मोठे उद्योग जिल्ह्यात येणे अपेक्षित.
पर्यटन विकासाला संधी
जिल्ह्यातून मध्य व दक्षिण रेल्वेचे ३९७ किलोमीटर लांबीचे लोहमार्ग आहेत. विविध गाडय़ांचे थांबे असल्याने येथील पर्यटनास चांगली चालना मिळते. सेवाग्राम व पवनार आश्रम तसेच बोर अभयारण्य, विश्वशांती स्तूप, गीताई मंदिर, विविध जलाशय व त्याभोवतीचा परिसर पर्यटकांची गर्दी खेचतो. सेवाग्राम विकास आराखडय़ामुळे गांधीवादी परिसर अत्यंत प्रेक्षणीय व जगभरातील पर्यटकांचे आकर्षणकेंद्र ठरला आहे. तसेच विविध योजनांमधून ग्रामीण व शहरी भागात शौचालये बांधण्यात आली आहेत.
सर्वाधिक लागवड कापसाची
प्रामुख्याने कृषिप्रधान असलेल्या वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख असून ग्रामीण ८ लाख ७७ हजार तर नागर लोकसंख्या ४ लाख २३ हजार आहे. लोकसंख्या घनतेत महाराष्ट्राच्या दर चौरस किलोमीटरमागे ३६५ च्या तुलनेत २०६ एवढी आहे. स्त्रियांचे प्रमाण दर हजार पुरुषांमागे ९४६ आहे. ८६ टक्के लोकसंख्या साक्षर असून स्थूल उत्पन्न २४ हजार ३९६ कोटी रुपये आहे. लागवडीखालील एकूण क्षेत्र ४ लाख ६२ हजार हेक्टर असून त्यापैकी ४ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड होते. सर्वाधिक लागवड कापसाची व त्यापाठोपाठ डाळवर्गीय पिकांची होते. ३२ हजार २०० हेक्टर जमीन ओलिताची आहे.
बचत गटाचे व्यवस्थापन राज्यात अव्वल
जिल्ह्यात बचत गटाचे व्यवस्थापन राज्यात अव्वल म्हणून गौरवले गेले आहे. २० हजार ५०० महिला व शेतकरी बचत गटांतून ग्रामीण भागातील अर्थकारण व रोजगार क्षमता सक्षम झाली आहे. ४३८ कोटी रुपयांवर यातील खेळते भांडवल आहे. अंत्योदय योजनेमार्फत दुर्बल घटकांना धान्यपुरवठा केला जातो.
शैक्षणिकदृष्टय़ा प्रगतिशील
शैक्षणिकदृष्टय़ा वर्धा जिल्हा अत्यंत पुढारलेला समजला जातो. मेघे अभिमत विद्यापीठ, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, राष्ट्रभाषा प्रचार समिती या शैक्षणिक संस्थांमध्ये देशविदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. दोन वैद्यकीय व पाच अभियांत्रिकी तसेच कृषी, औषधी निर्माणशास्त्र, विधि, चित्रकला व जवळपास सर्वच शाखेची महाविद्यालये कार्यरत असल्याने हा जिल्हा शिक्षणाची पंढरी म्हणूनही ओळखला जातो. ११०० पैकी ८८० गावात प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
मुख्य प्रायोजक: ’सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.
पॉवर्ड बाय: ’सिडको ’यूपीएल
’महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.)
नॉलेज पार्टनर’गोखले इन्स्टिटय़ूट, पुणे</strong>