कराड : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज (ता. कराड) येथील भराव पूल हटून प्रस्तावित सहापदरीकरणात उड्डाणपूल (सेगमेंटल) होण्याच्या उंब्रजकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्यास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिसाद देत उंब्रजच्या पुलाची व्यावहारिकता तपासण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात सुमारे २० हजार लोकसंख्येच्या उंब्रज येथे स्थानिकांचा प्रचंड विरोध असतानाही भराव पूल होऊन बाजारपेठेचे निमशहर असलेल्या उंब्रजचे थेट दोन विभागच होऊन त्याचा स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. व्यापारावरही विपरीत परिणाम झाला होता.
दरम्यान, महामार्गाच्या सहापदरीकरण कामात या ठिकाणी उड्डाणपूल (सेगमेंटल) होणे अत्यावश्यक असल्याची मागणी उंब्रजकरांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती. या संदर्भात चव्हाणांनी मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन तसेच भ्रमणध्वनीवरून संपर्क करून उंब्रजला सेगमेंटल पूल होण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार मंत्री गडकरी यांनी चव्हाणांच्या पत्राला उत्तर देऊन उंब्रज येथे मागणी केलेल्या पुलाची व्यावहारिकता तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा >>>“…ही सर्व नौटंकी आहे”, मनोज जरांगे यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय भेटीवर प्रकाश आंबेडकरांचं विधान
कराडच्या धर्तीवर सेगमेंटल पूल !
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांनुसार कराड व मलकापूर येथील जुना भराव उड्डाण पूल पाडून नवीन सेगमेंटल (पारदर्शक) उड्डाण पूल बांधण्याची प्रक्रिया सुरु असून त्यानुसार जुना भराव उड्डाण पूल पाडला असून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु आहे. याच धर्तीवर उंब्रज येथे पूल होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.