लोकसत्ता वार्ताहर

कराड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी याची अजून नीट स्पष्टता नाही. ‘महायुती’चे नेते निवडणूक एकत्रिक की स्वतंत्र लढवायच्या याचा निर्णय घेतील, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षाची भूमिका जाहीर करतील असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. हिंदी भाषेबाबत सरकार शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेईल, असे त्या म्हणाल्या.

कराडमध्ये खासगी कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. या वेळी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘पहिलीपासून हिंदी अनिवार्य’ यासंदर्भातील प्रश्नावर गोऱ्हे म्हणाल्या, राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारले असून, पहिलीपासून हिंदी शिकवण्यात येणार आहे. यावर अनेक मतमतांतरे आहेत. मात्र, सरकार शिक्षण तज्ज्ञ, लेखक व अभ्यासकांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल.

शेतकरी कर्जमाफीवरून नाराज असल्याच्या प्रश्नावर गोऱ्हे म्हणाल्या, खरेतर महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगले यश मिळाल्याने आघाडीच्या नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या. पण, विधानसभेला त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. परिणामी सध्या आघाडीचे नेते अस्वस्थ असून, रोज एका ठिकाणी आंदोलन करीत आहेत. सरकार व जनतेमधील संवाद बिघडवण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

लाडक्या बहिणींची नावे लाभार्थी यादीतून कमी केली गेल्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, लाडक्या बहिणींनी कागदपत्रांच्या पडताळणीवरून नाराज होऊ नये. कागदपत्रांच्या पडताळणीत त्रुटी आढळल्यानेच लाडक्या बहिणींची काही अपवादात्मक नावे कमी झाली असतील, तरीही त्यांना शासन प्रत्येकस्तरावर आणि प्रत्येक समाजासाठी विविध महामंडळे स्थापन करून न्याय देण्याचे काम करीत आहे. आम्ही अनेक लाडक्या बहिणींशी बोललो आहोत. पण, त्या नाराज नसल्याचे या वेळी दिसून आल्याचा निर्वाळा नीलम गोऱ्हे यांनी दिला.