“राष्ट्रवादी पक्षात फूट पडली नसून अजित पवार आमचेच नेते आहेत”, असं शरद पवार आज सकाळीच म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्याच्या राजकारणात आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या विधानावर अजित पवार काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष असताना अजित पवारांनी अवघ्या दोनच शब्दांत प्रकरण मिटवलं आहे.
अजित पवार आज पिंपरी येथे दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते विकासकामांची माहिती देत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला. त्यावर ते फक्त ‘नो कमेंट्स’ असं म्हणाले. “मला आज त्या विषयावर काहीच बोलायचं नाही”, असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना बगल दिली.
हेही वाचा >> Maharashtra Breaking News Live : अजित पवारांना पुन्हा संधी देणार का? शरद पवारांनी मांडलं रोखठोक मत
“नो कॉमेट्स बोलल्यानंतर प्रश्न येतो कुठे? विकासाचं बोला ना. शहरातील प्रश्न, त्यासंदर्भात कशी पारदर्शकता आणता येईल, गती देता येईल, यावर बोला. सर्वसामान्य लोकांना विकास हवाय”, असं अजित पवार म्हणाले. “आता जी काही भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याबाबत विचारा, मला कुठलाही वक्तव्य करायचं नाही. आता मी त्या गोष्टीत वेळ घालवू इच्छित नाही”, असंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा>> शरद पवारांनी अजित पवारांबाबत केलेलं वक्तव्य आशीर्वाद की राजकीय खेळी? धनंजय मुंडे म्हणाले…
शरद पवारांचं घुमजाव?
दरम्यान, अजित पवार आमचेच नेते आहेत, असं शरद पवार आज सकाळी म्हणाले होते. परंतु, आता त्यांनी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत घुमजाव केला आहे. मी असं बोललोच नाही, असं शरद पवार म्हणाले. तसेच, अजित पवारांना आता पुन्हा संधी मिळणार नसल्याचंही ते पुढे म्हणाले.