सातारा जिल्ह्यात करोनाचे सामूहिक संक्रमण दिसत नाही. जिल्ह्यात करोना संसर्ग रोखण्यास व साखळी तोडण्यास सर्व प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

जिल्ह्यात वाढता करोनाचा संसर्ग व टाळेबंदीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी वाई येथे भेट दिली. यावेळी आमदार मकरंद पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी संगिता राजापूरकर-चौगुले, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, तहसीलदार रणजित भोसले, गट विकास अधिकारी उदयकुमार कसुरकर, डॉ संदीप यादव, मुख्याधिकारी विद्या पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलिस निरीक्षक शाम बुवा व आशिष शेलार आदींकडून परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात करोना संसर्ग वाढत असून त्यादृष्टीने टाळेबंदी हाच उपाय असल्याचे सांगत देसाई म्हणाले, २२ जुलै नंतर टाळेबंदीतून कोणत्या बाबींना शिथिलता द्यायची याचा आढावा जिल्ह्यात जाऊन घेत आहे. कोणत्याही परिस्थितीत करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. त्यासाठी कडक उपाय योजना करण्यात येणार आहेत. वाई शहर पूर्णतः प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे. येथील रुग्ण संख्या नियंत्रणात आल्यावर आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी, पोलीस प्रशासन, तहसीलदार, पालिका मुख्याधिकारी आदींशी विचार विनिमय करून त्यात अत्यावश्यक बाबींसाठी शिथिलता दिली जाईल. नगरपालिकांकडे राखीव ठेवण्यात आलेल्या कोविडं निधी बाबत स्पष्ट निर्देश नसल्याने ही रक्कम खर्च करता येत नाही, यासाठी नगरविकास मंत्री व सचिवांशी बोलून मार्गदर्शन घेत आहे. यामुळे पालिकांना निधी खर्च करता येईल.

सध्या पोलीस यंत्रणेवर जादा ताण आहे. पंधरा-सोळा तास अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करावे लागते आहे.पोलिसांचा थेट संबंध नागरिकांशी येत असल्याने पोलीस बाधीत होत आहेत. त्यांची प्रकृती आता चांगली आहे. जिल्ह्यात पोलिसांचे संख्याबळ पुरेसे आहे, परंतु तरीही ३०० अतिरीक्त होमगार्ड पोलीस दलास मदतीसाठी दिले आहेत. जिल्ह्यातील करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन कोठेही कमी पडत नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य उत्पादन विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने त्यांच्या कारवाया कमी होत असल्याचे दिसते .मात्र आता स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेऊन कारवाया वाढवण्यात येतील. येथील लोकप्रतिनिधी व प्रशासनात चांगला समन्वय आहे. त्यामुळे येथे योग्य काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आज गृहराज्यमंत्र्यांनी खंडाळा, लोणंद, फलटण, दहिवडी भागाचा दौरा केला.  यावेळी पंचायत समितीचे उपसभापती भैया डोंगरे, शिवसेनेचे अनिल शेंडे, किरण खामकर आदी उपस्थित होते.

साताऱ्यात टाळेबंदी व जिल्हा प्रवेशबंदी असताना पुण्याहून सातारा जिल्ह्यात जुगार खेळण्यासाठी लोक येत आहेत .त्या जुगारींना ताब्यात घेत ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हा प्रवेश नाके आणखी कडक केले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. मात्र या लोकांनी प्रवेश पत्र नसताना प्रवेश केला असेल, नियम भंग केला असल्यास या प्रकरणाची पोलीस अधीक्षकांना उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील,   असेही  गृहराज्यमंत्री, शंभूराज देसाई म्हणाले.

Story img Loader