राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आज आपल्या शैलीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतल्याचे दिसून आले. “ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी बाजूला केले आहे, अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही”, अशी उपहासात्मक टीका शरद पवार यांनी पडळकरांचे नाव न घेता केली आहे.

शरद पवार सातारा येथे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की,  ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी बाजूला केले आहे, त्यांची अनामत जप्त झाली आहे. अशांना वेळोवेळी लोकांनी उत्तर दिले आहे. अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही.

आणखी वाचा- देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्धी मिळवतात, शरद पवारांचा टोला

दरम्यान, भाजपाचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे याविषयी स्वतः शरद पवार काय उत्तर देणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर, आज शरद पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल असताना त्यांनी, पत्रकारांशी बोलताना यावर भाष्य केल्याचे दिसले. साताऱ्यात ते रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा- भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले शरद पवार, अजित पवारांच्या भेटीला

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं.

“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.असं पडळकर म्हणाले होते.

Story img Loader