Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता शिवसेना नेत्याने राज ठाकरे महायुतीबरोबर येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. राज ठाकरेंनी जी भूमिका जाहीर केली त्यावर आज संजय राऊत यांनी बोचरी टीका केली. बिनशर्ट पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता भूमिका बदलली असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. मात्र शिवसेना (एकनाथ शिंदे) नेत्याने राज ठाकरे ( Raj Thackeray ) महायुतीबरोबर येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

“विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि घमासान असलेली होणार आहे. या निवडणुकीत मला आपले आमदार निवडून आलेले पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. काय घडतं आहे, काय घडू शकतं? याचं आकलन करा. मी तुम्हाला खरं सांगतो निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकिट मिळेल. असं राज ठाकरे Raj Thackeray म्हणाले आहेत.

हे पण वाचा- Raj Thackeray : “लाडका भाऊ आणि लाडकी बहीण दोघं एकत्र राहिले असते तर..”, राज ठाकरेंची टोलेबाजी

२५० जागांवर लढायची तयारी

“युती होईल का? कोणत्या जागा मिळतील? असला कुठलाही विचार मनात कुणीही आणू नका. आपण जवळपास २२५ ते २५० जागा लढवणार आहोत. तसंच आज कुणी कितीही मोठ्याने घोषणा दिल्या तरीही तिकिट पक्कं असं समजू नका. कुणी कुठल्याही भ्रमात राहू नका. तसंच मला काही जणांनी सांगितलं की आपला पक्ष काहींना सोडायचा आहे. त्यांना मी रेड कार्पेट घालून देतो, त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावं.” असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसंच १ ऑगस्टपासून राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा सुरु करणार असल्याचंही म्हटलं आहे. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर ( Raj Thackeray ) टीका केली. मात्र शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी राज ठाकरे आमच्या बरोबर येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

राज ठाकरे आमच्याबरोबर येतील असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. निवडणूक जाहीर होणं बाकी आहे, काहीही घडू शकतं पण मला विश्वास आहे की राज ठाकरे महायुतीबरोबर येतील असंही ते म्हणाले. ( राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे )( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

भरत गोगावले राज ठाकरेंबाबत काय म्हणाले?

“विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. आमचे नेते बसतील, त्यातून मार्ग निघेल. जो मार्ग निघेल तो चांगला मार्ग असेल. बऱ्याच ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी लोक इच्छुक आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीला वेळ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र येऊन याबाबत चर्चा करतील. राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळे राज ठाकरे आमच्याबरोबर येतील असं मला वाटतं.” असं भरत गोगावलेंनी म्हटलं आहे. त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.