लॉकडाउन नाही तर महाराष्ट्रात आता अनलॉकचीच प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे असं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. महाराष्ट्रातल्या करोनाच्या परिस्थितीबद्दल त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. ही बाब समाधानाची आहे. तसंच महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर गेल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.
आणखी वाचा- अर्थव्यवस्थेला उभं करण्यासाठी आता धाडसी निर्णय घ्यावे लागतील – देवेंद्र फडणवीस
करोनाला घाबरुन जाऊ नका मात्र काळजी घ्या असं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं. तसंच राज ठाकरेंनी याच कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं की आता सगळं सुरु केलं गेलं पाहिजे याबाबत विचारलं असता राजेश टोपे म्हणाले की राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमतच आहोत. फक्त एकदम सगळं सुरु करता येणार नाही. त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने गोष्टी सुरु करण्यावर भर देत आहोत.
आणखी वाचा- आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे
एवढंच नाही तर आरोग्य विभागातल्या सगळ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. प्राथमिक सेवा देणारा आमचा विभाग आहे. प्रत्येक ग्रामीण भागातील जागा भरल्या जातील. जिथे गरज आहे तिथे रुग्णालयंही वाढवणार आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे. मात्र एकदम सगळं सुरु करता येणार नाही त्यामुळे आम्ही टप्प्या टप्प्याने शिथिलता आणतो आहोत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.