लोकसत्ता वार्ताहर
कराड : सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी मुळात स्पर्धाच नव्हती. ती कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमांनी तयार केली होती. मी तर त्यासाठी मोर्चेबांधणी किंवा विशेष प्रयत्न केले नव्हते. दूरचित्रवाणीवरील बातम्यांतून मला साताऱ्याचे आपण पालकमंत्री झाल्याचे कळाल्याचे शंभूराज देसाई यांनी कराडमध्ये बोलताना सांगितले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले बंधू राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले हे साताऱ्याचे पालकमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे साताऱ्याचे पालकमंत्री हे पुन्हा शिवसेनेचे (शिंदे) नेते शंभूराज होणार की, भाजपचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे यांना संधी मिळणार यासंदर्भात तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु, राज्यातील महायुतीने पुन्हा शंभूराज देसाई यांनाच पालकमंत्री म्हणून कायम केल्याने याबाबत शंभूराज यांची प्रतिक्रिया महत्त्वाची होती.
पालकमंत्रिपदाचा निर्णय राज्याच्या नेतृत्वाकडून होताना त्यात या पदासाठी आपण मोर्चेबांधणी वगैर केली नसल्याचे शंभूराज यांनी स्पष्ट केले. मंत्री शंभूराज म्हणाले, पहिल्यांदा नव्हेतर तिसऱ्यांदा पालकमंत्री झालो असल्याने अनुभवामुळे पालकमंत्री झाल्याचे काही विशेष वाटत नाही. परवा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान, खासदार उदयनराजेंची व आपली भेट झाली. त्यांनी पुष्पगुच्छ देत आपणाला शुभेच्छाही दिल्या. मीही त्यांना पालकमंत्री म्हणून काम करताना तुमच्या आशीर्वादाची आणि मार्गदर्शनाची गरज आहे. तुमच्याच नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यात काम करणार आहोत, असा विश्वास दिल्याचे शंभूराज यांनी नमूद केले.
आपल्या पालकमंत्रिपदाच्या निवडीनंतर सातारा जिल्हा बँकेच्या एका महिला संचालकांनी माध्यमातून उघड नाराजी व्यक्त केली. शिवेंद्रराजेंना पालकमंत्री केले पाहिजे, अशी मागणी करताना वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. यासंदर्भात विचारले असता मंत्री देसाई यांनी त्यामुळे त्या जिल्ह्याला माहिती झाल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले.
ठाण्याचा पालकमंत्री होतो. ठाण्याचे पालकमंत्रिपद सांभाळणे तेवढे सोपे नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्या विश्वासाला पात्र राहून, सर्वांना बरोबर घेऊन आपण काम केल्याचेही मंत्री देसाई यांनी नमूद केले. सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून कार्यरत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पुणे- बंगळुरू महामार्गाच्या कराड दरम्यान, रखडलेल्या कामामुळे लोकांना खूप त्रास सोसावा लागत असल्याकडे लक्ष वेधले असता शंभूराज म्हणाले, डी. पी. जैन कंपनीचे अधिकारी नुकतेच मुंबईला मला भेटायला आले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण त्यांना वेळ देऊ शकलो नाही. पण आता त्यांना बोलावून घेऊन या कामाला गती देण्यासाठी सूचना करणार असल्याचे मंत्री शंभूराज यांनी सांगितले.