देशभरात आजपासून एकीकडे १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पुरेसा लसपुरवठा न झाल्याने लसीकरणाच्या मोहिमेत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातही लसींची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तयार होणारी लस दुसऱ्या देशांना देण्याची गरज नव्हती, त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासत आहे, असं म्हणत पवार यांनी मोदी सरकारच्या धोरणावर अप्रत्यक्षपणे टीका केली. तसेच, सध्या कुंभमेळा, सार्वत्रिक निवडणुका यामुळे करोनाग्रस्तांचं प्रमाण वाढल्याचंही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदर पूनावालांनी महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती :
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुण्यात विधान भवन येथे आज (दि. १) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत अनेक प्रश्नांवर त्यांनी भूमिका मांडली. यावेळी बोलताना, “राज्याला अधिक लस मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेदरम्यान निश्चित लसीचा अधिकाधिक पुरवठा केला जाईल असे त्यावेळी सांगितले गेले. मात्र नंतर एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र आणि देशासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती. लसीचा प्लांट आपल्या पुण्यात असल्याने, आपल्या इथे अधिक लस कशी मिळेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे” अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. शिवाय, सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात देण्याची गरज नव्हती त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासल्याचेही त्यांनी सांगितले.

कुंभमेळा, सार्वत्रिक निवडणुका यामुळे करोनाग्रस्तांचे प्रमाण वाढले :
“लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतला आहे. तरी देखील राज्य सरकार भारत बायोटेककडे अधिक लस कशा मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या येथील नागरिकांचे अधिकाधिक लसीकरण कसे होईल यावर सरकारचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, सध्या देशात आणि राज्यात कुंभमेळा, सार्वत्रिक निवडणुका यामुळे करोना बधितांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत”, असंही पवार म्हणाले.

राज्यात आजपासून 18 ते 44 पर्यंतच्या वयातील नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात :
आज 1 मेपासून राज्यात 18 ते 44 पर्यंतच्या वयातील नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात होत आहे. 5 कोटी 71 लाख एवढी लोकसंख्या या वयोगटातील आहे. तरी साधारण 6 कोटी लोकसंख्या असेल आमचा अंदाज आहे. त्यानुसार दोन वेळा डोस द्यावा लागणार, असल्याने 12 कोटी डोस घ्यावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत साडे सहा हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. ही संपूर्ण रक्कम आम्ही एकरकमी देण्यास तयार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्याच बरोबर आपल्या राज्याला आजच्या दिवशी 3 लाख मिळाल्या असून पुणे जिल्ह्यासाठी 20 हजार लसी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There was no need to give vaccines to other countries because of that we facing shortage of vaccines says ajit pawar sas