पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़ या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक व्हिडिओ शेअर करत, पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
“पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपाचा प्रोपगंडा फुटला. मोदींच्या ताफ्यासमोर आंदोलनकारी नसून भाजपाचे कार्यकर्ते होते, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.” असं नाना पटोले यांनी ट्विट केलं आहे. या, ट्विटसोबत पटोलेंनी व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा जात असलेल्या रस्त्याच्या कडेला उभा राहून भाजपा कार्यकर्ते घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत. या वेळी मोदींचा वाहन ताफा काही क्षण थांबल्याचेही दिसून येत आहे.
तर, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत ट्विट केलं आहे. “निदर्शने करणारे शेतकरी एक किलोमीटर दूर होते. जे जवळ होते ते भाजपाचे लोक होते, मोदींचं ढोंग जनतेच्या समोर आहे.” असं त्यांनी म्हटलं आहे.
मोठी बातमी! आंदोलकांनी रस्ता अडवल्याने मोदींचा ताफा अडकून पडला; रद्द करावी लागली सभा
फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले होते. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंजाब दौऱ्यात मोदींच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार होता.
“दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर बसून होते, आता पंतप्रधानांना फक्त १५ मिनिटं थांबावं लागलं तर…”
पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधल्याचे दिसून आले. “दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एका वर्षाहून अधिक काळ बसून होते, परंतु आता पंतप्रधानांना केवळ १५ मिनिटं थांबावं लागलं तर त्यांना त्रास होऊ लागला. ” असे सिद्धू म्हणाले आहेत. याचबरोबर, हा दुटप्पीपणा का? असा सवाल देखील सिद्धू यांनी केला आहे.