Nitin Gadkari on Satellite Base Free Tolling System : टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्याकरता सरकार पातळीवर अनेक उपाययोजना आणल्या जात आहेत. त्याकरता फास्ट टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु, फास्टटॅगकरताही टोलनाक्यावर गाड्यांना उभं राहावं लागतंय. देशातील टोलनाकेच आता बंद व्हावेत याकरता केंद्र सरकारने नवी यंत्रणा राबवण्याचा विचार केला आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली. ते दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्येनमालेत बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, “टोलबद्दल मी जास्त सांगणार नाही. पण १५ दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल की टोलबद्दल तुमची कोणतीही तक्रार असणार नाही. पण मी महाराष्ट्रातील टोलबद्दल बोलत नाहीय. राष्ट्रीय महामार्गांबाबत बोलत आहे.”

ते पुढे म्हणाले, “सॅटलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम (Satellite Base Free Tolling System) तयार करतोय. यामुळे टोलनाके राहणार नाहीत. तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार.”

मुंबई गोवाबाबत काय म्हणाले नितीन गडकरी?

नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाचा विषय काढताच त्यांना स्वतःलाच हसू उमटले. म्हणाले, “मुंबई-गोवा महामार्गासाठी खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता १०० टक्के पूर्ण होणार. हा रस्ता बराच रेंगाळला. दिल्ली-जयपूर आणि मुंबई-गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट्स आहेत. त्याच्या अडचणी खूप आहेत. कोकणातील सत्य सांगितलं तर तुम्हाला चालणार नाही. पण १४ ते १५ जण ३ एकर शेतीचे मालक. त्यांच्यात भावा-भावांमध्ये भांडणं. कोर्ट केसेस झाल्या. त्या जमिनीच्या मोबदला देता देता पुरेवाट लागली. पण समस्या सुटली आहे.”