वाई : खासदारकीचा निकाल वेगळा आला तर आपल्याला अडचणी निर्माण होतील. निवडणुकीत एखादे गणित बिघडले तर दुरुस्त करायला वेळ लागतो. लोकांची मानसिकता लगेच बदलणे शक्य होत नाही. पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचे काम आपल्याला करावेच लागेल पक्षाविरोधात कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये अशी सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांना केली
लोकसभेच्या अनुषंगाने आज शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक निवासस्थानी आयोजित केली होती. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सातारा शहर आणि सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली. आता लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पाठीशी ताकद निर्माण करायची आहे. त्यासाठी सोमवार दि ८ रोजी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखानास्थळी कोरेगाव व सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत सातार्यातून पक्ष देईल त्या उमेदवाराचे सर्वांनी काम करावे, चर्चा होतात, आरोप-प्रत्यारोप होऊन त्याच्या बातम्या येत असतात. त्यामुळे आपल्याला ताकद कुणी दिली, विकासकामांना निधी कुणी दिला, हे लक्षात ठेवून पक्षाचे काम आता करायचे आहे.
आणखी वाचा-“एकलव्याने एक अंगठा दिला होता, पण मी फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला तयार”; सदाभाऊ खोत यांचे विधान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकष न लावता सातारा-जावली विधानसभा मतदारसंघ असो किंवा सातारा शहरातील विकासकामांना कधीही निधी कमी पडू दिला नाही. त्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत.त्यामुळे त्यांच्या पाठीशी ताकद निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. मागील वेळच्या पेक्षा जास्त मताधिक्क्य वाढले पाहिजे. आताही ताकद लावायची असून स्थानिक संघर्ष सुरु असून तो भविष्यातही कायम राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपली ताकद वाढली आहे. . जसा मी तुमच्या पाठीशी आहे तसे फडणवीस माझ्या पाठीशी आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्ष देईल त्या उमेदवारांचे काम सर्वांना करायचे आहे. शिवेंद्रराजे यांनी यावेळी उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध नसल्याचे स्पष्ट केले . पक्षाने त्यांना जर उमेदवारी दिली तर मी नक्कीच काम करणार असे त्यांनी यावेळी ठाम सांगितले .
या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर उदयनराजे यांच्या विरोधात अनेक नगरसेवकांनी तक्रारीचा पाढा वाचला. ज्येष्ठ नगरसेवक अशोक मोने व अविनाश कदम यांनी उदयनराजे यांच्या उमेदवारीला ठाम विरोध केला आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विरोध पाहून शिवेंद्रराजे यांनीही कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन दिले.