कराड : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी (दि. ७) रखरखत्या उन्हात चुरशीने मतदान होत आहे. ‘महायुती’चे खासदार उदयनराजे भोसले यांचेविरुध्द ‘महाविकास आघाडी’चे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात साताऱ्याची लढत कडव्या संघर्षाची बनली आहे. दोन्ही बाजूने राजकीय संघर्षातील सर्व आयुधांचा वापर करीत श्रेष्ठींच्याही प्रतिष्ठा पणाला लागल्याने हातघाई दिसते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभेच्या सातारा मतदारसंघाची मतदारसंख्या १८ लाख ८० हजार ४९५ असून, त्यात ९ लाख ५४ हजार २९३ पुरुष, ९ लाख २६ हजार १३१ महिला तर, ७५ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघाच्या क्षेत्रात विधानसभेच्या सहापैकी सातारा, वाई, कोरेगाव, पाटण या चार मतदारसंघावर ‘महायुती’चे तर, कराड दक्षिण व कराड उत्तर या दोन मतदारसंघावर ‘महाविकास आघाडी’चे वर्चस्व आहे.

आणखी वाचा-महाबळेश्वर पाचगणी या पर्यटन स्थळावर मतदानाची शाई दाखवल्यास खाद्यपदार्थांवर सवलत

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह ‘महायुती’च्या जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. तर, ज्येष्ठनेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, श्रीनिवास पाटील यांनी सभांवर सभा घेवून भाजपचा वारु रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यामुळे साताऱ्यात प्रथमच कमळ फुलणार की तुतारी वाजणार याची कमालीची उत्सुकता राहिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर प्रथमच सातारा मतदारसंघातून घडयाळ चिन्ह गायब झाले आहे. तर, छत्रपती शिवाजीमहाराजांचे वंशज उदयनराजे हे गतखेपेच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व ‘महायुती’च्या बहुतेक प्रमुख नेत्यांनी सभा घेवून रान उठवले आहे. तर, सातारा जिल्ह्यावर पक्कड असणारे खासदार शरद पवार यांनीही सातारची जागा सलग सातव्यांदा आपल्याकडे कायम राखण्यासाठी कमालीचे प्रयत्न केले आहेत. त्यांना ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांनी कंबर कसून साथ दिल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत भोसलेंविरुध्द शिंदे यांच्यातील लढत टोकदार होवून सर्वदूर गाजते आहे. त्यासाठी उद्या मंगळवारी मतदानातून फैसला होणार असलातरी त्याची पोलखोल येत्या चार जूनला होणार आहे.

आणखी वाचा-विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ विधानावरुन मुख्यमंत्री शिंदे संतापले; म्हणाले, “त्यांचं डोकं फिरलंय…”

काल रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून जाहीर प्रचाराची रणधुमाळी थांबल्यानंतर गाठीभेटींची धावपळ सुरु झाली आहे. मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले. तर, मतदान केंद्रनिहाय नियोजनासाठी कार्यकर्ते झटत असल्याचे चित्र आहे. यंदा प्रथमच उन्हाची तीव्रता उच्चांकी असल्याने सकाळच्या प्रहारीच आपल्या समर्थक मतदारांचे मतदान करून सुरुवातीपासूनच आपली बाजू भक्कम करण्यासाठी रस्सीखेच राहणार आहे. त्यासाठी व्यक्तिगत गाठीभेटींना महत्व आले असून, उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची अक्षरशः धावपळ सुरु आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There will be rush to vote in satara in dry summer battle between shashikant shinde and udayanraje bhosale mrj