गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं आहे. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे.
आज त्यांनी भायखळा आग्रीपाडा येथील शिवसेना शाखा क्रमांक २१२ ला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “गद्दार हे गद्दारच असतात. त्यांचं नाव कितीही बदललं, त्यांनी कितीही गट बदलले तरी गद्दारीचा शिक्का त्यांच्या माथ्यावरून पुसला जाणार नाही.”
हेही वाचा- “मराठीचा अपमान होताना मुख्यमंत्र्यांनी चकार शब्द काढला नाही” VIDEO शेअर करत काँग्रेसची टीका
पुढे त्यांनी म्हटलं की, “पण गद्दारांची पोटदुखी हीच असेल की, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे कधी विधानभवनात गेले नव्हते. त्यांचे जे काही धंदे सुरू होते, ते आम्ही कधी बघितले नव्हते. पहिल्यांदा हे सगळं दिसायला लागलं, म्हणून त्यांना पोटदुखी सुरू झाली असेल. साधारणत: दिवाळीच्या आसपास एका आठवड्यात उद्धव ठाकरेंवर एक नव्हे तर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. यावेळी बंडखोर आमदारांनी आपल्यासोबत कोण-कोण येतंय? यासाठी जुळवा-जुळव सुरू केली. आपण मुख्यमंत्री बनतोय का? यासाठी चाचपणी केली. ही कसली राक्षसी वृत्ती किंवा महत्त्वाकांक्षा असेल? राजकारण म्हणून ही बाब सोडून द्या. पण उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाली असताना ते माणुसकी देखील विसरून गेले.”
“आता ते स्वत:ला बंडखोर म्हणत आहेत. पण बंडखोर कोण असतो? ज्याच्यात बंड करण्याची ताकद असते, हिंमत असते. तो एकाच ठिकाणी उभं राहून सांगू शकतो, हे चुकीचं सुरू आहे. याच्याविरोधात मी बंड करतोय. पण हे बंडखोर नव्हते, हे गद्दारच होते. कारण हे येथून पळून सुरतेला गेले आणि सुरतेहून गुवाहाटीला गेले. तिथे जाऊन मजा-मस्ती केली” अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.