शिवसेना खासदार संजय राऊत अलीकडेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली होती. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने राऊतांना समन्स बजावला आहे. १ डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात हजर न झाल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
बेळगाव न्यायालयाने समन्स दिल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. “बेळगाव येथील न्यायालयात बोलवून मला अटक करण्याचं कटकारस्थान रचलं जात आहे. दोन दिवसांपूर्वी याबाबतची माहिती माझ्या कानावर आली आहे” असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. २०१८ साली केलेल्या भाषणात आक्षेपार्ह काय होतं, तेच कळलं नाही, असंही राऊत म्हणाले.
“कर्नाटक सरकारने कायद्याचे बडगे दाखवून तुरुंगात डांबलं तर त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटतील. माझ्या भाषणात प्रक्षोभक काय होत? तेच कळलं नाही. पण २०१८ साली केलेल्या भाषणाची आता दखल घेऊन त्यांनी मला न्यायालयात हजर राहायला सांगितलं आहे. याचा अर्थ असा की, मी न्यायालयात गेल्यावर माझ्यावर हल्ला होईल, ही माझी माहिती आहे. बेळगाव न्यायालयात गेल्यावर मला अटक करावी आणि मला तिकडे बेळगावच्या तुरुंगात टाकावं, अशा प्रकारचं कारस्थान सुरू असल्याचं माझ्या कानावर आलं आहे” असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
राऊत पुढे म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी चार दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगलीचा भाग तोडून कर्नाटकाला जोडण्याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांनी या विषयाला तोंड फोडलं. पण महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून आम्ही लढा देत आहोत. त्यामुळे आम्हाला कायदेशीर बाबींमध्ये गुंतवणे, बेळगावात बोलवून हल्ले करणे, असं कारस्थान शिजताना मला दिसतंय. याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी. शिवसेनेनं सीमाप्रश्नासाठी ६९ हुतात्मे दिले आहेत. मी ७०वा हुतात्मा व्हायला तयार आहे. बाळासाहेबांनीही सीमा प्रश्नासाठी तीन महिन्याचा तुरुंगवास भोगला आहे,” असंही राऊत म्हणाले.