लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात घरफोड्यांसह चोऱ्या, लुटमारीचे गुन्हे वाढत असताना चोरट्यांची मजल आता जीवित आणि मालमत्तेच्या आणि कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची घरफोडी करण्यापर्यंत गेली आहे. शहर पोलीस आयुक्तालयात एका महत्वाच्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी हिसका दाखविल्याची घटना उजेडात आली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची घरफोडी झाली असून यात चोरट्यांनी सुमारे सहा लाख रूपयांचा ऐवज लांबविला आहे. अश्विनी भोसले विजापूर रस्त्यावर सैफुलच्या अलिकडे पाटील नगरात राहतात. १६ डिसेंबर ते १८ डिसेंबर या काळात त्यांचे घर फोडण्यात आले. पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले घराला कुलूप लावून आपल्या वृद्ध आईला भेटण्यासाठी मुंबईत गेल्या होत्या.

आणखी वाचा-सोलापुरात चादर कारखान्यास आग लागून १२ रॅपियर्स यंत्रमाग भक्ष्यस्थानी

दरम्यान, चोरट्यांनी संधी साधून त्यांचे घर फोडून सहा लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अणि ३५ हजार रूपयांची रोकड लंपास केली. या गुन्ह्याची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले ह्या शहरातील पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळणा-या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी सलगर वस्ती आणि सदर बझार पोलीस ठाण्यांसह विशेष शाखेचाही कारभार पाहिला होता. त्यांचेच घर फोडण्यात आल्यामुळे आता पोलीस अधिका-यांची घरेही सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves broke into the house of a female police inspector in solapur mrj